सर्व गुढांमध्ये 'मौन' ही सुद्धा माझीच विभूती आहे. या जगामध्ये ज्ञानी लोकांमध्ये ज्ञान म्हणून जे काही असते ती सुद्धा माझीच विभूती होय! म्हणून तसे बघायला गेलास तर माझ्या विभूतींना अंत नाही...!

श्रीमद् भगवतगीतेच्या दहाव्या अध्यायाचा ३५ वा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या विभूतींची तपशीलवार माहिती देत आहेत. इथे विभूती म्हणजे विशेष रूप, विशेष ओळख दाखवणारा आविष्कार.
हे अर्जुना, वेदांमध्ये जी अनेक स्तोत्रे आहेत त्यात "बृहत्साम" नावाचे जे स्तोत्र आहे ते म्हणजे मी आहे. वाङमयातील सगळ्या छंदांमध्ये जो गायत्री छंद आहे, तो मी आहे. ऋतूंमध्ये फुलांची खाण असणारा जो वसंत ऋतू तो मी आहे आणि मासांमध्ये मी मार्गशीर्ष मास आहे.
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्।
जयोsस्मि व्यवसायोsस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्।।३६।।
वृष्णीनां वासुदेवोsस्मि पाण्डवानां धनंजय:।
मुनीनामप्यहं व्यास: कवीनामुशना कवि:।।३७।।
सरळ अर्थ : हे अर्जुना, मी फसविणाऱ्यामध्ये द्यूत आणि प्रभावशाली पुरुषांचे तेज आहे. तसेच मी जेत्यांचा विजय आहे. मी निश्चय करणाऱ्यांचा निश्चय आहे तसेच सात्विक पुरुषांचा सात्त्विक भाव आहे.
वृष्णिवंशी (यादवांच्या वंशामध्ये 'वृष्णी' नावाचेही एक कुल होते) पुरुषांमध्ये मी वासुदेव अर्थात् तुझा प्रिय सखा आहे. पांडवांमध्ये धनंजय अर्थात् तू म्हणजे मीच आहे, मुनींमध्ये वेदव्यास मी आहे तसेच कवींमध्ये कवी शुक्राचार्य ही मीच आहे.
विस्तृत विवेचन : चव्हाट्यावर स्पष्ट चोऱ्या होतात, त्या निवारायला मी येत नाही; पण छळ करणाऱ्यांमध्ये फाशांनी खेळायचा जो जुगार असतो तो मीच आहे, हे तू निश्चितपणे समज. तेजस्वी वस्तूंमध्ये तेज म्हणून जे काही असते ती माझीच विभूती आहे असे तू समज. सगळ्या अंगीकृत कार्यांमध्ये खऱ्या अर्थाने जो विजय असतो, तोही मीच होय.
व्यवसायांमध्ये मी न्याय्य व्यवसाय आहे आणि सगळ्या सत्त्वगुणसंपन्न पुरुषांमध्ये सत्त्व म्हणून जे काही असतं ते ही मीच होय.
हे पार्था, यादवांमध्ये वसुदेव-देवकी यांचा पुत्र म्हणून मथुरेत अवतीर्ण झालेला व ऐश्वर्याने विभूषित असा तुझ्यासमोर उभा असलेला जो भगवंत, तो मीच आहे. वसुदेवाने मी जन्मताच मला गोकुळात नेऊन यशोदेजवळ ठेवले आणि यशोदेची मुलगी जी योगमाया तिला तिथून आणले. पार्था, ज्याने स्तनपानाचे निमित्त करून पूतनेचे प्राण शोषले (पूतना नावाची राक्षसी आपला विषारी स्तन पाजून कृष्णाला मारण्याकरिता कंसाने गोकुळात पाठविली होती. कृष्णाने तिचे कपट जाणून इतक्या जोराने स्तनपान केले की तिचे प्राण कासावीस होऊन ती मरून पडली) ज्याने बाळदशा संपण्यापूर्वीच देव-दानवरहित सृष्टी निर्माण केली; ज्याने गोवर्धन उचलून धरून महेंद्राचे गर्वहरण केले; ज्याने कालिया नागाचे मर्दन करून कालिंदी नदीचे दु:खनिवारण केले (कालियाला जर्जर करून त्याला आपल्या मूळ जागी रमणक द्वीपात पाठवले आणि त्याच्या विषाने मरून पडलेल्या गायी-गोपाळांना जिवंत केले); ज्याने वणव्यापासून गोकुळाचे रक्षण केले; ज्याने पाडकांसकट दुसऱ्या वासरांसह गायी निर्माण करून प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा गर्वपरिहार केला (कृष्णाच्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यासाठी एकदा विरंचीने म्हणजे ब्रह्मदेवाने मोहनास्त्र घालून गाईगोपाळास अदृश्य केले असता, कृष्णाने त्यांची रूपे धरून वर्षभर सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे चालविला. तेव्हा ब्रह्मदेवाचा गर्वपरिहार होऊन त्याने गाई-गोपाळ परत केले!) ज्याने तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवता ठेवताच कंस-चाणुरासारखे मोठमोठे दुष्ट सहज लीलेने एकाएकी नाहीसे करून टाकले, तो यादवातील कृष्ण भगवंत, हे सव्यसाची अर्जुना, मीच आहे. आणि सोमवंशी पांडवांमध्ये जो तू अद्वितीय असा धनुर्धारी आहेस, तोही मीच आहे! त्यामुळे तुझ्या व माझ्या परस्पर प्रेमभावांत अंतर पडू शकत नाही.
हे सव्यसाची, तू जेव्हा लौकीकदृष्ट्या संन्यासी होऊन माझी बहीण पळवून नेलीस, तेव्हा त्या स्थितीतही माझ्या मनात तुझ्या बाबतीत विकल्प आला नाही याचे कारण तू व मी आपण एकच आहोत (कृष्ण व बलराम यांची बहीण सुभद्रा ही उपवर झाली असता बलरामाने तिला दुर्योधनाला देण्याचै योजिले. सुभद्रेच्या मनातून अर्जुनाला वरावे असे होते. तेव्हा अर्जुनाने त्रिदंडी संन्यास घेऊन बलरामाच्या घरी आपले बस्तान बसविले व एके दिवशी श्रीकृष्णाच्या सहाय्याने तिला पळवून नेले!)
मुनींमध्ये श्रेष्ठ असे जे भगवान श्री व्यासदेव तेही मीच आणि कवीश्वरांयध्ये थोर कविवर्य धैर्यवंत श्री शुक्राचार्य तोही मीच.
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि
जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं
ज्ञानवतामहम् ।।३८।।
सरळ अर्थ : दमन करणाऱ्यांमधील दंडशक्ती मी आहे. विजयाची आकांक्षा धरणाऱ्यांची नीती मी आहे. गुपित राखण्याच्या भावनेतील मौन मी आहे आणि ज्ञानवंतामधील ज्ञान मीच आहे.
विस्तृत विवेचन : ज्याच्या योगाने अगदी सूक्ष्म कीटकांपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचे जीवन नियमन होते असे जे अढळ अनिवार्य शासन-सत्ता-राज्यकारभार ते माझे स्वरूप आहे. पुढे यादवेंद्र देव श्रीकृष्ण म्हणाले की हे कुंतीपुत्रा, सार व असार यांचा निर्णय करून धर्म-ज्ञानाचा नित्य कैवार घेणारे सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ असे जे नीतिशास्त्र आहे ते मीच होय! स्वभावतःच जे न बोलणारे (म्हणजे अत्यंत कमी बोलणारे) असतात, त्यांच्या मनात काय चालले आहे, याचे ज्ञान ब्रह्मदेवालाही होणे कठीण असते. म्हणून सर्व गुढांमध्ये 'मौन' ही सुद्धा माझीच विभूती आहे. या जगामध्ये ज्ञानी लोकांमध्ये ज्ञान म्हणून जे काही असते ती सुद्धा माझीच विभूती होय! म्हणून तसे बघायला गेलास तर माझ्या विभूतींना अंत नाही.
(क्रमशः)

- मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३