मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांचे दोन गट तयार झाले आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. हा वाद समाजमाध्यमांवर उघडपणे सुरू झाला आहे. दोन्ही नेते समझोत्यास तयार नसल्यामुळे आरजीपी फक्त फुटण्याचाच नाही तर संपण्याच्याही वाटेवर आहे, हे वेगळे सांगायला नको. पोरांनी केलेली गोष्ट वाऱ्यानेच नेल्यासारखी गत आरजीपीची होणार आहे.

रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गोव्यात म्हण आहे ‘पोरांनी केले आणि वाऱ्याने नेले’ म्हणजे पोरांनी केलेली कुठलीही गोष्ट वाऱ्याच्या एका धक्क्याने विस्कटून जाते. मुलांनी केल्यामुळे त्यात गांभीर्य नसते. वाऱ्याची झुळूक आली, तर त्यात ते उडून जाते. या म्हणीसारखीच स्थिती आहे सध्या आरजीपी या प्रादेशिक पक्षाची. हा पक्ष फुटावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. इतर छोट्या-मोठ्या पक्षांनी आरजीपीला संपविण्यासाठी अनेकदा आपापल्या परीने प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. हा पक्ष ज्या तरुणांनी उभा केला, त्या तरुणांमध्ये कालपरवापर्यंत एकी होती. त्यांनी अनेक फितुरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला. विधानसभा, जिल्हा पंचायत निवडणुका लढवल्या. विधानसभा निवडणुकीत मगो, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षांपेक्षा जास्त मते आरजीपीने मिळवली. पण पक्षाला मिळालेले हे यश जास्त काळ टिकण्याची शक्यता आता धूसर आहे. दुर्दैवाने आज त्या पक्षाची स्थिती नाजूक आहे. उघडपणे आमदार वीरेश बोरकर यांनी आपली बाजू मांडलेली नसली, तरी त्यांच्या बाजूने असलेल्या सर्वांनीच आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांच्या विरोधात सोशल मीडियावर गरळ ओकण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनोज परब आणि विश्वेश नाईक यांनी वीरेश बोरकर यांच्या समर्थकांवर थेट हल्लाबोल केला. काही राजकीय नेत्यांनी आपली माणसे आरजीपीत पेरली होती, यापासून ते वीरेश बोरकर यांनी खुलासा करावा यापर्यंतच्या पोस्टस् दिवसभर सोशल मीडियावर झळकत आहेत. त्यामुळे एकंदरीत पाच वर्षे वयाचा हा पक्ष फुटण्याच्या मार्गावर आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. शेवटी अनेक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी हा पक्ष फोडण्यासाठी केलेला खटाटोप यशस्वी होताना दिसत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पक्ष सावरण्यासाठी अजूनही वेळ आणि संधी दोन्ही शिल्लक आहेत.
‘पोरांचा पक्ष’ म्हणून हिणवून घेतल्यानंतर आता पोरखेळ करूनच या पक्षाची दैना होत असेल, तर हे दुर्दैवी आहे. तरुण राजकारण बदलू शकतात. आरजीपीने तशा प्रकारचे राजकारण केंद्रस्थानी ठेवून निवडणुका लढवल्या. काही प्रमाणात यशही मिळाले. पण पक्ष मोठा व्हायच्या आधीच त्याला भेगा पाडल्या गेल्या. आजपर्यंत तेच काम सुरू आहे. गोव्यातील कॅडर मजबूत असलेल्या पक्षाच्या हाती असलेली सत्ता काढून घेण्यासाठी आरजीपी सारख्या पक्षामध्ये धमक होती. ती धमक आता उरलेली नाही. आरजीपीने तरुणांमध्ये एक उत्साह निर्माण केला होता. जे तरुण राजकारण आणि राजकारण्यांकडे तुच्छतेने पाहतात, ते आरजीपीच्या बॅनरखाली सक्रियपणे राजकारण करताना गोव्याने पाहिले. आरजीपीने पहिल्याच निवडणुकीत एक आमदार दिला आणि जिल्हा पंचायतीवरही आपले सदस्य निवडून आणले. भलेही त्यांना मोठे यश मिळालेले नाही, पण अनेक मतदारसंघांत मित्रपक्षांसोबत युती केली असती तर पक्षाला संधी होती. विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना आरजीपीमध्ये उभी फूट पडत असल्याने कुठलाही राजकीय पक्ष आरजीपीला सोबतही घेण्याआधी विचार करेल. आरजीपी हाती असलेली संधी घालवून बसणार हे निश्चित.
पक्षात आता दोन गट पडले आहेत; मनोज परब, विश्वेश नाईक आणि अजय खोलकर या पदाधिकाऱ्यांचा एक गट, तर लिसिओ रोन्कोन, आदित्य देसाई, झेडपी तृप्ती बकाल यांसारख्या वीरेश बोरकर यांच्या निकटवर्तीयांचा दुसरा गट मनोज परब यांच्या विरोधात उघडपणे प्रचार करत आहे. परब यांच्या विरोधातील एका गटाची मडगावमध्ये बैठक झाली आणि आरजीपीवर कशा पद्धतीने हक्क सांगता येईल त्याबाबत चर्चा झाली. इतर पक्षांतील काही राजकीय नेते आरजीपी फोडण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना फूस लावत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच या पक्षाचे तुकडे पडताना दिसतील. पक्ष फोडून चिन्हासाठी न्यायालयात दाद मागण्याचाही पर्याय एका गटाने खुला ठेवला आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांचे दोन गट तयार झाले आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. हा वाद समाजमाध्यमांवर उघडपणे सुरू झाला आहे. दोन्ही नेते समझोत्यास तयार नसल्यामुळे आरजीपी फक्त फुटण्याचाच नाही तर संपण्याच्याही वाटेवर आहे, हे वेगळे सांगायला नको. पोरांनी केलेली गोष्ट वाऱ्यानेच नेल्यासारखी गत आरजीपीची होणार आहे.