महाराष्ट्रात शत-प्रतिशत, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २०२९ पर्यंत आहे त्यानुसार अजून तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. असे असताना महायुतीमधील काही घटक पक्ष शत प्रतिशतची भाषा बोलू लागले असून मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही घोषित केले आहेत.

Story: विचारचक्र |
11th May, 09:10 pm
महाराष्ट्रात शत-प्रतिशत, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

देशात पाच राज्यांत नुकत्याच निवडणुका संपन्न झाल्या. तीन राज्यांत भाजपने मताधिक्य मिळवले आहे, तर केरळ आणि तमिळनाडूमध्ये चर्चा सुरू आहेत. अशावेळी महाराष्ट्रातील महायुतीमधील राष्ट्रवादीचे (शिंदे गटाचे प्रवक्ते) संजय गायकवाड यांनी तर शत-प्रतिशतची बोली सुरू केली आहे. शिवसेनेमध्ये काल प्रवेश घेतलेले बच्चू कडू यांनी तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुकरर झाल्याचे सांगितले, तर इकडे अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी सुनेत्रा पवार या २०२९ला मुख्यमंत्री होतील, असे सांगून बॅनर झळकवले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता उद्या काय होईल हे आज सांगता येणार नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय जाधव म्हणतात. मात्र त्यानंतर ही शत-प्रतिशतची भाषा सुरू झाली आहे.

देशभरात भाजप वाढत असताना आजच शत-प्रतिशतची घोषणा करणे म्हणजे महायुतीमध्ये बिब्बा टाकण्यासारखे आहे. संजय गायकवाड यांनी शत-प्रतिशतची घोषणा करताना पुढील निवडणूक भाजप स्वबळावर लढेल, असे म्हटले होते.

देशभरात प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तमिळनाडू व केरळ या पाचही राज्यांत प्रादेशिक पक्षांची ससेहोलपट झाली. एका बाजूला जयललिता, तर दुसऱ्या बाजूला करुणानिधी असे दोन गट निर्माण झाल्यानंतर या दोन गटांकडे आलटून पालटून गेली २० वर्षे सत्ता होती. केरळमध्ये आता काँग्रेस सत्तेवर येत आहे. बंगालमध्ये १५ वर्षे सत्तेत असलेली ममतादीदी यांची तृणमूलची सत्ता लोकांनी फेकून दिली.

देशामध्ये सध्या २२ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजपचा अश्वमेध उधळला असताना शिवसेना शत-प्रतिशत म्हणत आहे.

अचानकपणे एका भीषण अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला आणि राजकारण बदलले. दरम्यान, राष्ट्रवादी एकीकरणाची भाषा शरद पवार गटाकडून सुरू झाली. त्याला पूर्णविराम मिळून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. यामागे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोर्चेबांधणी केली होती. शरद पवार गटाचे रोहित पवार हे अधूनमधून विरोधी वातावरण निर्माण करत होते. दरम्यान, प्रफुल्ल पटेल व तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. अजितदादांच्या मृत्यूचे राजकारण रोहित पवार यांनी दणक्यात सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर आता अजितदादा पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार यांनी २०२९ मध्ये सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री होतील असे भाष्य केले. एवढेच नव्हे, तर तसे बॅनरही झळकवले. विधानसभेत सध्या ४० आमदार राष्ट्रवादीचे आहेत. हे लक्षात घेता तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री होऊ शकतात का, हा एक प्रश्न आहे.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे राज्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिदि हे पॉवरफुल होत आहेत, यामध्ये वाद नाही. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनीही मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच विराजमान होतील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे म्हटले आहे. बच्चू कडू हे आक्रमक पुढारी म्हणून ओळखले जातात. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांचा भाजप आमदाराने पराभव केला. तिथून ते भाजपवर रागावलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी हे हेरूनच विदर्भात आपला पाय रोवण्यासाठी बच्चू कडू यांना बरोबर घेतले. बच्चू कडू यांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्या प्रहार संघटनेने शिवसेनेत विलीन व्हावे, अशी अट एकनाथ शिंदे यांनी घातली होती, परंतु कडू यांनी आपली संघटना राजकीय काम न करता सामाजिक स्थरावर काम करील असे सांगून प्रहार संघटनेचे अस्तित्व कायम ठेवले. यापूर्वी शिंदे यांचा एक मोठा गट गुवाहाटीला गेला होता. त्यावेळी बच्चू कडू हे अपक्ष मंत्री म्हणून त्यात सामील झाले होते. भाजपला शह देण्यासाठी बच्चू कडू यांना शिवसेनेत घेतले असे बोलले जाते. अमरावतीमधील रवी राणा, नवनीत राणा यांच्या विरोधात या कडू यांनी संघर्ष केला होता. त्यामध्येच त्यांचा पराभव झाला. आता तेच कडू मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिदि हेच २०२९ मध्ये असतील, असे भाष्य केले. याबाबत खासदार संजय जाधव यांचे एक म्हणणे संयुक्तिक होते. त्यांनी म्हटले उद्या काय होईल हे आज सांगता येणार नाही. सध्या ते शिवसेना उबाठा गटाचे खासदार असले तरी त्यांचे मातोश्रीवर पटत नाही. त्यांनी उद्या काय घडेल हे अजून स्पष्ट केले नाही. विशेष म्हणजे भाजपचा अश्वमेध देशभर उधळत असताना शत-प्रतिशत व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अशी बाष्कळ बडबड करत आहेत. त्यामुळे याचा फारसा फरक भाजपला पडेल असे वाटत नाही. मात्र एक निश्चित की एकनाथ शिंदे आपला पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, हे नाकारता येणार नाही. नुकताच ऑपरेशन लोटसचा एक ड्रामा दिल्लीमध्ये शिजला, परंतु त्याची जाहीरपणे चर्चा सुरू झाल्याने ऑपरेशन लोटस बाजूला पडले. मात्र असे असले तरी शिवसेना उबाठाचे खासदार, आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नुकताच मुलुंडचे शिवसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या गाडीत बसून प्रवास केला. शिवसेना उबाठाच्या नऊ खासदारांमध्ये पाच खासदार शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. परंतु जोपर्यंत सहावा खासदार येत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही एवढे नक्की.

सध्या उबाठामध्ये घालमेल सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची सूत्रे आदित्य ठाकरे यांनी हाती घेतली आहेत. विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना घेण्याचे जवळ जवळ निश्चित झाले होते, परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही. उद्धव ठाकरे यांनी आपले नाव मागे घेतले आणि अंबादास दानवे यांचे नाव पुढे केले. विशेष म्हणजे अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरे यांनी न करता आदित्य ठाकरे यांनी केली. गेले काही दिवस संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असा सुप्त संघर्ष सुरू आहे. राज्यसभेवर शिवसेनेच्या चतुर्वेदी यांना देण्याचे आदित्य ठाकरे यांनी नक्की केले होते, परंतु संजय राऊत यांनी शिवसेनेकडे ही राज्यसभेची जागा न मागत शरद पवार यांचे नाव पुढे आणले आणि त्यामधूनच हा वाद पेटला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शत-प्रतिशत व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार पुढे येत आहेत. विशेष म्हणजे भाजप याबाबत सावध भूमिका घेत आहे. पाहूया पुढे काय होते. मात्र एक निश्चित की राष्ट्रवादीची धुरा आता पटेल व तटकरे यांच्याकडून पार्थ व जय पवार यांच्याकडे गेली आहे. त्या दिशेने या सर्व हालचाली सुरू झाल्या आहेत.


- अरविंद भानुशाली