वाहन चालकांच्या शिस्तीवरच रस्ता सुरक्षा अवलंबून

Story: अंतरंग |
13th May, 09:48 pm
वाहन चालकांच्या शिस्तीवरच रस्ता सुरक्षा अवलंबून

गोव्यातील रस्ते अपघातांची आकडेवारी जाहीर झाली आहे. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 'भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या २०२४' या अहवालानुसार, राज्यातील ९६ टक्क्यांहून अधिक रस्ते अपघाती मृत्यू हे केवळ वाहनचालकांच्या चुकीमुळे झाले आहेत. वाहनातील तांत्रिक बिघाड किंवा रस्त्यांची दुरवस्था यापेक्षा मानवी चूकच जीवावर बेतत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. २०२४ मध्ये राज्यात एकूण २,६८२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यात २८९ जणांनी आपला जीव गमावला. विशेष म्हणजे, यातील २७८ मृत्यू (९६.१९ टक्के) हे बेजबाबदारपणे वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे किंवा अतिवेग यांमुळे झाले आहेत. यामध्ये अतिवेगामुळे ११३ जणांचा, तर धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यामुळे १६७ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे ५ जणांना प्राण गमवावे लागले. इतर कारणांमध्ये रस्त्यावर जनावरे आडवी येणे, चुकीचे पार्किंग आणि चालकाच्या शारीरिक समस्यांचा समावेश आहे. मात्र त्यांचे प्रमाण तुलनेने अत्यल्प आहे.

राज्यात दुचाकी चालकांच्या मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. २०२१ च्या तुलनेत २०२४ मध्ये दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण ५.५ टक्क्यांनी वाढले आहे. २०२४ मधील एकूण मृतांपैकी ७२.३१ टक्के म्हणजेच २०९ जण दुचाकीस्वार होते. याउलट, चारचाकी चालक आणि पादचाऱ्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. चारचाकी चालकांचे मृत्यू १५.४५ टक्के, तर पादचाऱ्यांचे मृत्यू १४.५३ टक्के नोंदवण्यात आले आहेत. 

सायकलस्वार, ट्रक चालक आणि बस चालकांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. ​२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये रस्ते अपघातांच्या एकूण प्रमाणात ५.८ टक्क्यांनी घट झाली आहे. ही एक सकारात्मक बाब आहे. जखमींचे प्रमाण २.४० टक्क्यांनी तर मृत्यूचे प्रमाण १.०२ टक्क्यांनी कमी झाले आहे. रस्ते अपघातातील ९६ टक्के मृत्यू हे वाहनचालकांच्या चुकीने झाले असतील तर ते नकीच टाळता येण्यासारखे होते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे,  दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे, सर्व वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहने वेगमर्यादेत चालवणे आदी आदी मूलभूत गोष्टी केल्यास अपघातातील मृतांची संख्या कमी होईल. ही आता काळाची गरज बनली आहे. केवळ कायदे करून किंवा रस्ते सुधारून अपघात थांबणार नाहीत, तर त्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने जबाबदारीने वाहन चालवणे अनिवार्य आहे.

- पिनाक कल्लोळी