
नवी दिल्ली : व्ही. डी. सतीशन (VD Satheesan) यांची केरळच्या नव्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. काँग्रेसने गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
केरळच्या प्रभारी दीपा दासमुन्शी (Deepa Dasmunshi) तसेच पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अजय माकन (Ajay Maken) आणि मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांनी पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा केली.
मुख्यमंत्रीपदासाठी व्हीडी सतीशन यांच्यासह के. सी. वेणुगोपाल (KC Venugopal) आणि रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांची नावे चर्चेत होती. मात्र अखेर पक्षश्रेष्ठींनी सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun Kharge) यांची भेट घेतल्यानंतर निर्णय प्रक्रियेला वेग आला होता. दोघांमध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाल्यानंतर पक्षाने सर्व विचारविनिमय पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले होते.
४ मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने १४० पैकी १०२ जागांवर विजय मिळवत दोन-तृतीयांश बहुमत मिळवले होते. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.