पेपरफुटीचा विळखा पाच राज्यांत

नवी दिल्ली : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट युजी २०२६' परीक्षा पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादळात सापडली आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, या पेपरफुटीचे जाळे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ अशा पाच राज्यांत पसरले आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने (CBI) आपल्या हाती घेतला असून १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नासिक कनेक्शन: प्रिंटिंग प्रेस मधूनच फुटला पेपर?
या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील नासिक येथील 'प्रिंटिंग प्रेस' असल्याचे समोर येत आहे. शुभम नावाच्या मुख्य संशयिताने नासिकच्या छापखान्यातून पेपर बाहेर काढल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. या कामात त्याला पुणे आणि नासिकमधील काही स्थानिक लोकांची मदत मिळाली. धक्कादायक म्हणजे, शुभमने मूळ पेपरमध्ये काही अतिरिक्त प्रश्नांची भर घालून तो 'गेस पेपर' म्हणून पुणे आणि हरियाणातील टोळ्यांना मोठ्या रकमेत विकला.
शुभम खैरनार
गुरुग्राम टोळीचा देशव्यापी प्रसार
नासिकमधून बाहेर पडलेला हा पेपर हरियाणाच्या गुरुग्राममधील एका सक्रिय नेटवर्कपर्यंत पोहोचला. या टोळीने व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून देशभर हा पेपर पसरवला. "हाच खरा पेपर आहे आणि यातीलच प्रश्न परीक्षेत येणार," असे सांगून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. डिजिटल चॅट्स आणि बँक व्यवहारांच्या माध्यमातून आता सीबीआय या नेटवर्कचा पर्दाफाश करत आहे.
मांगीलाल आणि दिनेश
राजस्थानमध्ये ३० लाखांत व्यवहार
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, जयपूर ग्रामीणमधील जमवारामगड येथील मांगीलाल आणि दिनेश या दोन भावांनी गुरुग्राम टोळीकडून २६-२७ एप्रिल रोजी सुमारे ३० लाख रुपये देऊन हा पेपर खरेदी केला. त्यांनी हा पेपर सीकरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या आपल्या मुलांपर्यंत आणि पुढे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. सीकरमधील राकेश मंडावरिया या कौन्सिलरनेही आपल्या ओळखीचा वापर करून पीजी चालक आणि कोचिंग क्लासच्या संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांना हा पेपर पुरवला.
केरळ कनेक्शन आणि एसओजीची कारवाई
या गुन्ह्याची व्याप्ती केरळपर्यंतही पोहोचली आहे. केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याकडे हा पेपर पोहोचला होता, ज्याने तो पुन्हा राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्कुलेट केला. राजस्थानच्या 'एसओजी'ने (SOG) आतापर्यंत १५० हून अधिक लोकांची चौकशी केली असून, त्यापैकी १५ मुख्य संशयितांना सीबीआयच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये मांगीलाल, दिनेश, राकेश मंडावरिया, रजत कुमार आणि इतरांचा समावेश आहे.
राकेश मंडावरिया
सीबीआयचा पुढील तपास
सीबीआयने आता या प्रकरणी गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, चोरी आणि विश्वासघात अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमध्ये काही बडे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, हा पेपर नेमका किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, याचा शोध घेतला जात आहे.