वैभववाडीत करूळ धरणात बुडून ३ शाळकरी मुलींचा करुण अंत

मैत्रिणीला वाचवताना दोन्ही बहीणींनी गमावला जीव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10 mins ago
वैभववाडीत करूळ धरणात बुडून ३ शाळकरी मुलींचा करुण अंत

पणजी :वैभववाडी तालुक्यातील करूळ-जामदारवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या सात जणांपैकी तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. फोटो काढण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण करूळ गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तन्वी अनंत माळकर (वय १६, रा. करूळ भोयडेवाडी), ऋतिका संतोष पाटील (वय १८, रा. मुंबई/करूळ), स्वरा संदीप सुर्वे (वय ११, रा. कुसूर/मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. 




मिळालेल्या माहितीनुसार, करूळ भोयडेवाडी येथील सात तरुण-तरुणी दुपारी चारच्या सुमारास जामदारवाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. धरणावर पोहोचल्यानंतर तन्वी, ऋतिका आणि स्वरा या तिघींना फोटोंचा मोह आवरला नाही. त्या धरणाच्या पाण्यात उतरल्या आणि त्यांनी फोटोही काढले. मात्र, याच दरम्यान ११ वर्षीय स्वराला पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तन्वी आणि ऋतिका या दोघीही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात ओढल्या गेल्या. काठावर असलेल्या इतर मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.




मृत तन्वी माळकरने नुकतीच दहावीची परीक्षा ५५% गुणांनी उत्तीर्ण केली होती. शिकून मोठे होण्याचे तिचे स्वप्न होते, मात्र त्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. ऋतिका पाटील ही मुंबईहून उन्हाळी सुट्टीसाठी गावी आली होती. विशेष म्हणजे, अकरा वर्षांची स्वरा सुर्वे ही आपल्या आजीच्या उत्तरकार्यासाठी मामाच्या गावी आली होती. आजीच्या उत्तरकार्याच्या दिवशीच नातीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.




घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर आणि अन्य महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने तिघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा