‘नीट’मध्ये पारदर्शकतेचा अभाव

‘नीट’चे पेपर तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत गोपनीय असणे आवश्यक आहे. असे प्रकार पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी ‘एनटीए’ने यात सुसूत्रता आणण्याची गरज आहे. पेपर फुटणार नाही अशा प्रकारची परीक्षा यंत्रणा तयार करण्याची गरज आहे.

Story: संपादकीय |
13th May, 09:50 pm
‘नीट’मध्ये पारदर्शकतेचा अभाव

पुन्हा ‘नीट’चे पेपर फुटले. ३ मे रोजी झालेली ‘नीट’ परीक्षा आता रद्द झाल्यामुळे देशातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ‘नीट’ पेपर फुटण्याचा प्रकार नवा नाही. गेल्या दहा वर्षांत अनेकदा ‘नीट’ जी पूर्वी अखिल भारतीय पूर्व वैद्यकीय परीक्षा म्हणून ओळखली जायची, तिचे पेपर फुटल्याची उदाहरणे आहेत. भारतात अनेक स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होत असल्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका सुरू केली आहे. काही ठिकाणी ‘नीट’ पेपर लीकच्या विरोधात आंदोलनेही सुरू आहेत. गोव्यात तर पुन्हा ‘नीट’ परीक्षेला बसावे लागेल या भीतीने एका विद्यार्थ्याने आत्महत्याच केली. विद्यार्थ्याच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबायला हवा. 

देशभरात लाखो विद्यार्थी ‘नीट’ रद्द झाल्यामुळे मानसिक तणावाखाली आहेत. पुन्हा पुन्हा पेपर फुटीचे प्रकार घडतात, यावरून ही परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेला गोपनीयता बाळगण्यात अपयश येते का, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने पेपर लीकच्या घटनेनंतर ३ मे रोजी झालेली ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी हवी आणि परीक्षेत पारदर्शकता राहावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे ‘एनटीए’चे म्हणणे आहे. पण जे नुकसान झाले आणि विद्यार्थ्यांना जे मानसिक त्रास होतात, त्याची जबाबदारी कोणी घ्यायची आणि एवढ्या मोठ्या परीक्षेची गोपनीयता कशी टिकत नाही? का वारंवार पेपर फुटीचे प्रकार घडतात? हा प्रकार टाळण्यासाठी काहीच उपाय का केले जात नाहीत? असे प्रश्न निर्माण होतात. ज्या दोन विषयांतील पेपरची पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर फिरत होती, तो प्रकार ७ मे रोजी कसा लक्षात आला? तपास यंत्रणेने पीडीएफ ३ मे पूर्वीच टेलिग्रामवर होती असे म्हटले आहे. हा प्रकार आधीच रोखता आला असता, तर ‘नीट’ रद्द करण्याची नामुष्की ओढवली नसती. ती परीक्षा घेण्यापूर्वीच तारीख बदलून नवा पेपर तयार करणे शक्य होते. पण ‘नीट’बाबत ‘एनटीए’ गंभीर नाही असेच दिसते. कारण पेपर फुटतो तरीही त्याबाबत कोणाला थांगपत्ता लागत नाही आणि चार दिवसानंतर या गोष्टी लक्षात येतात, यावरून किती सावळागोंधळ चालतो, तो लक्षात येतो. बनावट पेपर विक्रीपासून ते टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ‘नीट’चे खोटे पेपर विकण्याचा काळाबाजार लोकांनी सुरू केला होता. असे १२० टेलिग्राम चॅनल बंद केले गेले. परीक्षेपूर्वी जे शक्य आहे ते सर्व उपाय ‘एनटीए’ने केले होते, असे असतानाही परीक्षेला आलेल्या प्रश्नांना जुळतील असे प्रश्न असलेले पेपर हाती लागले. ही प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात ३ मे पूर्वीच मोबाइलवर फिरत होती. ‘नीट’मधील काही पेपरमधील प्रश्न यात होते. त्यामुळेच परीक्षा रद्द केल्याचे ‘एनटीए’चे म्हणणे आहे. यावरून पेपर फुटीचे प्रकरण गंभीर आहे, हे लक्षात 

येते. 

‘नीट’चे पेपर तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत गोपनीय असणे आवश्यक आहे. असे प्रकार पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी ‘एनटीए’ने यात सुसूत्रता आणण्याची गरज आहे. पेपर फुटणार नाही अशा प्रकारची परीक्षा यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. पेपर फुटीचा लाभ घेऊन परीक्षा देणारे अनेक अपात्र लोक आजही वैद्यकीय क्षेत्रात घुसलेले असतील. जेव्हा प्रकार उघड होतो, तेव्हाच पेपर फुटल्याचे लक्षात येते; अन्यथा असे प्रकार यापूर्वीही घडलेले असतील. फुटलेल्या पेपरचा फायदा घेऊन आणि लाखो रुपये मोजून पुढे आलेले अनेक विद्यार्थी आजही डॉक्टर म्हणून वावरत असतील. मेहनत करणाऱ्या चांगल्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. गोव्यात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, कारण त्याला पुन्हा ‘नीट’ द्यायची नव्हती. अशा प्रकारे अनेक विद्यार्थी आज मानसिक तणावात असतील. त्यांचाही विचार करण्याची गरज आहे. ‘नीट’मध्ये पारदर्शकता राहत नसेल, तर ‘एनटीए’सारख्या संस्थेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होतील. ‘नीट’मध्ये पारदर्शकता हवी त्यासाठी परीक्षेची पद्धत बदलणे आणि परीक्षेला येणाऱ्या पेपरमध्ये प्रश्नांची मोठी बँक तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच विषयाचे पण वेगवेगळे प्रश्न येतील, अशा प्रकारची सुरक्षित प्रश्नसंच पद्धत अमलात आणण्याची गरज आहे. आजही विद्यार्थ्यांना प्रश्नांची सरमिसळ असते, पण प्रश्नांची बँक किती मोठी आहे त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. ‘नीट’ परीक्षा सुरक्षित कशा पद्धतीने घेता येईल, त्यासाठी ‘एनटीए’ने विचार करायला हवा. फक्त परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.