सरकारी नोकरीचे आम‌िष दाखवून तिघांकडून घेतले पैसे; फोंडा पोलिसांकडून आणखी एकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 mins ago
सरकारी नोकरीचे आम‌िष दाखवून तिघांकडून घेतले पैसे; फोंडा पोलिसांकडून आणखी एकाला अटक

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (Goa medical college) सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने तिघांकडून पैसे उकळल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी सुभाष सीताराम नाईक (राहणारा पाळी-डिचोली)  याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. 

यापूर्वी सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांकडून पैसे घेतल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. त्यानंतर आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी देण्याचे आम‌िष दाखवून पैस घेऊन फसवणूक केल्याची तक्रार तिघांनी फोंडा पोलिसांकडे केली होती. पैसे घेतले पण नंतर नोकरी दिली नाही व पैसेही परत केले नसल्याने; पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करून सुभाष नाईक याला अटक केली आहे. याप्रकरणी फोंडा पोलीस (Ponda Police) अधिक तपास करीत आहेत.

अनेकांची फसवणूक 

दरम्यान; यापूर्वी महिलेला अटक करण्यात आल्यानंतर व आता आणखी एकाला अटक केल्यानंतर बरेचजण नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फसवणूक केल्याच्या तक्रारी देण्यासाठी पुढे सरसावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे याप्रकरणी आणखी तक्रारी नोंद होण्याची व आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा