सर्वांना एकत्र जमून एकमेकांची भेट घेता यावी, एकमेकांशी विचार विनिमय करता यावे यासाठी गावडाेंगरीच्या मल्लिकार्जुन मंदिरात ‘भाेवर’ हा उत्सव सुरू करण्यात आला व या देवाचे भाविक भाेवरीमध्ये सहभागी हाेऊ लागले. परंपरेनुसार हजाराे भाविक श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात आनंद उपभाेगताना दिसतात.

प्राचीन काळात भारतीय संस्कृतीच्या प्रगतीचे माेजमाप करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे येथील देव-देवतांची भव्य मंदिरे. काणकाेणमध्ये श्रीस्थळ मल्लिकार्जुन, निराकार, श्री वेताळ, श्री परशुराम, श्री पायिक देव, नवदुर्गा, शांतादुर्गा अशी विविध श्रद्धास्थाने पहावयास मिळतात. या देवालयातून विरामेळ, शिशिरान्नी, अवसर काैल, गडे, भाेवर या सारखे उत्सव वर्षभर चालूच असतात.
या तालुक्यात मल्लिकार्जुनाची चार मंदिरे आहेत. त्यापैकी गावडाेंगरी येथील मल्लिकार्जुन मंदिर सर्वांत प्राचीन मंदिर असल्याचे सांगण्यात येते. हे गाव आदिमानवाने वसवले. डाेंगरावरील गाव यावरुन ‘गावडाेंगरी’ हे नाव पडले असावे. आपल्या कृषीप्रधान संस्कृतीनुसार आदिमानव या डाेंगरमाथ्यावर नाचणी, कुळीथ, वरी, पाखड या सारखी पिके काढून आपला उदरनिर्वाह चालवत असे. घनदाट जंगलाचा परिसर स्वच्छ करत असताना केपे येथे त्यांना देवाची मूर्ती सापडली. ती आपल्या बराेबर घेऊन तसेच ते पुढे गेले.
आज ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या बराेबर असलेले सर्व सामान ठेवले. पुन्हा पुढे जाताना देवाची मूर्ती त्या जागेवरुन कशीच हलेना. देवानी आपल्याला या ठिकाणीच रहायचे असल्याचा दृष्टांत दिला. त्यामुळे तेथील जागा स्वच्छ करुन त्यांनी देवाला तिथे ठेवले व लहानसे मंदिर बांधले. श्रद्धाळू आदिमानव त्याच ठिकाणी वस्तीला राहून देवाची पूजा-अर्चा, नैवेद्य, अशी सेवा करु लागला.
पुढे नाेकरी-व्यवसायाच्या निमित्ताने लाेक जवळपासच्या गावात स्थायिक झाले. प्रत्येक घरवईमध्ये ‘देवघर’ही निर्माण केले. परंतु सर्वांना एकत्र जमून एकमेकांची भेट घेता यावी, एकमेकांशी विचारविनिमय करता यावे यासाठी गांवडाेगरीच्या मल्लिकार्जुन मंदिरात ‘भाेवर’ हा उत्सव सुरु करण्यात आला व या देवाचे भाविक भाेवरीमध्ये सहभागी हाेऊ लागले. परंपरनुसार हजाराे भाविक श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात आनंद उपभाेगताना दिसतात.
गांवडाेंगरी श्री मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासनाधिश्वर मंदिरात फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी जत्रा भरते. जत्रेच्या आदल्या दिवशी देवाची पालखी मिरवणूक काढतात. प्रत्येकाच्या घरवईमध्ये पालवछत्री व खांब आहे. हाेळीच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक घरवईतील छत्र्या-खांब नेसवतात व त्यातील एक छत्री पूजेला लावतात. या दिवसात सर्व लाेक साेवळे पाळतात. बारा वर्षांखालील मुलीला दिवजाला घालतात, तर १२ वर्षांखालील मुलाकडून देवाला ‘गुडी’ घालण्याची प्रथा आहे. यावेळी त्यांचा उपवास असताे. गुढीला दिण्याची काठी वापरतात. नक्षीदार काठीला पांढऱ्या कपडाची गुढी बांधून भाेवरीत सहभागी हाेतात.
फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी पहाटे प्रत्येक घरवईकडून भाेवर निघते. यावेळी घरवईतील धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व घरवई वाड्यावरील मुख्य भाेवरीत सहभागी हाेतात. वाजत-गाजत त्या भाेवरी गावडाेंगरीवर मल्लिकार्जुन मंदिराकडे येतात, पहिल्या भाेवरीचा मान भारसा, सार्ताेली व तुडले यांना प्राप्त झालेला आहे. नंतर भुपर, नागे, झिल्तावाडी व चाळीकार, इंद्रवाडकर, वावुर्लीकर अशा प्रकारे तीन भाेवरी वाजत-गाजत येऊन एका ठराविक ठिकाणी पाेचल्यावर मंदिरातील पालवछत्री त्यांच्या आदरातिथ्यासाठी जाते. भाेवरीला मंदिराच्या ताेरणाजवळ आणून साेडते व मंदिरात जाते.
दुसरी भाेवर आणण्यासाठी पुन्हा बाहेर जाते. अशा प्रकारे तीनही भाेवरी मंदिराच्या ताेरणा जवळ येऊन थांबतात. ताेरणातून त्या सर्वांना आत घेण्यासाठी मंदिरातून देवाचा टाका व ‘पालवछत्री’ वाजत गाजत ताेरणांपर्यंत येते. ताेरणा जवळ असलेल्या ‘आवणास’ देवाच्या चाैथऱ्यावर एक गावकर, तीन वेळीप व तीन देसाई सातही वांगडी नारळ वाढवतात. त्यानंतर इतर इच्छुक नारळ वाढवतात. रानटी फुले वाटण्याची प्रथा आहे. ही फुले अंतराळात फुलतात, साेवळी व स्वच्छ असतात असा समज आहे.
काेणत्याही संकटाशिवाय जत्रा पार पडू दे अशी देवाला प्रार्थना करतात व गाऱ्हाणे घालून वाद्याच्या गजरात सर्व भाेवरी मंदिराच्या आवारात प्रवेश करतात आणि जत्रेला सुरुवात हाेते. भाेवर म्हणजे मिरवणूक. या भाेवरीत छाेट्यापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण माेठ्या आनंदाने सहभागी हाेतात. आपल्या परीने देवाची माेठ्या श्रद्धेने सेवा करतात. पायात चप्पल न घालता जाणे, कमरेला धाेतर गुंडाळणे, डाेक्याला फेटा बांधणे यासारख्या प्रथा माेठ्या श्रद्धेने आचरणात आणतात. कुमारिका, सुवासिनी दिवज डाेक्यावर घेऊन भोवरीत सहभागी हाेतात. हे दिवज मातीचेच असते. मंदिराला पाच फेरे मारल्यानंतर गुढीची काठी माेडून गुढी मंदिराजवळ टाकतात. जत्रा संपेपर्यंत दुपार हाेते. सर्वांना महानैवेद्य असताे. दुपारी ३ वाजता देवाचा अवसर असताे. सर्व भाविकांना अवसर काैल मिळाल्यावर जत्रेची सांगता हाेते.