कळंगूटची ग्रामदेवता आदिशक्ती श्री शांतादुर्गा

कळंगुट येथे जगप्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. हा बीच ‘समुद्रकिनाऱ्यांची राणी’ म्हणून देश-विदेशात ओळखला जातो. या समुद्र किनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर, मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला कळंगुटची ग्रामदेवता आदिशक्ती श्री शांतादुर्गा देवीचे भव्य मंदिर आहे.

Story: देवभूमी गोवा |
15th May, 07:28 pm
कळंगूटची ग्रामदेवता  आदिशक्ती श्री शांतादुर्गा

गोव्यात पोर्तुगीज राजवटीच्या प्रारंभीच्या काळात अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यापैकी एक कळंगूटची ग्रामदेवता आदिशक्ती श्री शांतादुर्गाचे मंदिर होय. पोरियाट कळंगुट येथील श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर पोर्तुगीज शासक उद्ध्वस्त करणार असल्याची चाहुल लागताच मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थांनी त्वरित मंदिरातील देवीची मूर्ती अज्ञात स्थळी हालवली. नंतर नानोडा डिचोली येथे ग्रामस्थ व भक्तांनी 

श्री शांतादुर्गा (कळंगूटकरीण) देवीचे मंदिर उभारले. त्यावेळी तिथे मराठा राजवट होती. पुढे कालांतराने डिचोलीसह गोव्याचा इतर भाग पोर्तुगीजांच्या राजवटीखाली आला.

मराठी शाळेतच सुरू झाले धार्मिक कार्यक्रम

पोर्तुगीजांनी महाजन कायदा आणून मंदिरे आपल्या नियंत्रणाखाली ठेवली. देवीच्या दर्शनासाठी नानोडा येथे जाणे कळंगुट ग्रामस्थांना त्याकाळी अवघड ठरत होते. कळंगुट नाईकवाडा येथे मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा होती. शाळेचे मास्तर नारायण मलबारी यांनी शाळेत शिक्षणाबरोबर धार्मिक कार्यक्रमही सुरू केले. नानोडा येथे जाणे अवघड ठरत असल्याने ग्रामस्थांनी शाळेतच देवीच्या नावे साप्ताहिक मंगळवार उत्सव सुरू केला. हळूहळू सरस्वती पूजा, गणेश चतुर्थी, आषाढी एकादशी, कोजागरी पौर्णिमा आणि विशेष म्हणजे १५ ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजा हे उत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनी श्री सत्यनारायण महापूजा

विशेष म्हणजे, देश स्वतंत्र झाला होता; पण गोवा पोर्तुगीज राजवटीखाली होता. देशात सर्वत्र १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा होत होता; मात्र गोव्यात सन्नाटा. अशावेळी कळंगूट ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शाळेत दरवर्षी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी श्री सत्यनारायण महापूजा सुरू केली. स्वातंत्र्यदिनी होणारी श्री सत्यनारायण महापूजा आताही दरवर्षी मंदिरात होत आहे.

शाळेच्या जागेवरच उभे राहिले मंदिर

ग्रामस्थांनी शाळेच्या जागेवरच देवीचे नवीन मंदिर उभारण्याचे ठरविले. २३ एप्रिल १९८५ रोजी मंदिराची पायाभरणी करून १७ एप्रिल १९८९ रोजी (अक्षयतृतीया) मंदिरात श्री शांतादुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूर्वीच्या शाळेत जे उत्सव सुरू होते, ते सर्व उत्सव या मंदिरात सार्वजनिक स्वरूपात सुरू आहेत. यात आता अन्य काही उत्सवांची भर पडली आहे. त्यात रंगपंचमी, रथसप्तमी, नवरात्रोत्सव, गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, दहीहंडी, अक्षयतृतीयेच्या दिनी देवीचा वर्धापनदिन सोहळा व दुसऱ्या दिवशी श्री देवीची पालखी मिरवणूक होत आहे.

हे मंदिर महाजन कायद्याखाली सरकार दप्तरी नोंद करण्यात आले आहे. बार्देश तालुक्याचे मामलेदार तथा देवालय प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा कारभार सुरळीत सुरू आहे.   

सदानंद नार्वेकर, कळंगूट, गोवा