बार्देश तालुक्यातील शापोरा नदीकाठी वसलेल्या व चोहोबाजूंनी झाडा-माडाने वेढलेल्या निसर्गरम्य अशा रेवोडा गावात शेकडो वर्षांपूर्वी ग्रामदेवता, आराध्यदैवत श्री वेताळ माऊली भूतनाथ पंचायतन देवस्थानची स्थापना झाली. सन १९९४ साली मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले.

गोव्यातील लोक धार्मिक वृत्तीचे आहेत. गेली कित्येक वर्षे ते देवस्थानच्या परंपरा, रूढी, सण यांची जपणूक तन मन धन अर्पण करून व देवावर श्रद्धा ठेवून करत आहेत. अनेक वर्षांपूर्वी पूर्वजांनी रेवोडा गावी स्थापन केलेले श्री वेताळ माऊली भूतनाथ पंचायतन मंदिर हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. रेवोडा गावातील मंदिरसुद्धा पोर्तुगीजांनी उद् ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. अशा स्थितीत हिंदू संस्कृती टिकावी आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून देवतांच्या मूर्तींना वाचवण्यासाठी आपली कुलदैवते घेऊन रेवोड्यातील ग्रामस्थ पेडणे महालातील धारगळ येथे गेले. पेडणे महाल त्या काळी भोसले (मराठा) यांच्या राजवटीखाली होता. पुढे धर्म समिक्षणाच्या बंदीनंतरच्या काळात समझोता होऊन देवाच्या मूर्ती परत रेवोड्यात आणायचे ठरले. त्यानुसार पूर्वजांनी (फडते) देवाप्रती निष्ठा ठेवून गावाला गतवैभव प्राप्त व्हावे व ग्रामस्थांना देवाचा सदैव आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून धारगळ येथे स्थलांतरित केलेल्या देवतांच्या मूर्ती रेवोडा येथील चवाठा येथे स्थापित केल्या.
१९९४ मध्ये मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण
कालांतराने या मूर्ती आताच्या जागी स्थलांतरित करून तेथे भव्य मंदिर उभारण्यात आले. शापोरा नदीकाठी बाजूला हिरवीगार शेती आणि वनराईत टेकडीवर हे मंदिर आहे. गावातील ज्येष्ठ महाजनांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या मदतीने सन १९९४ साली मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले. श्री वेताळ माऊली भूतनाथ पंचायतनची प्रतिष्ठापना माघ शु. दशमी शके १९१५ म्हणजेच सोमवार, दि. २१ फेब्रुवारी १९९४ या दिवशी झाली. देवस्थानचे महाजन (फडते) शेकडो वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोचेमाड गावातून रेवोडा येथे स्थायिक झाले. देवस्थानचे व्यवस्थापन फडते (महाजन) समिती नेमून करतात. मंदिरात वर्षभर तिथीनुसार अनेक कार्यक्रम उत्साहात पार पडतात. श्री वेताळ माऊली भूतनाथ पंचायतन संस्थानची १९२८ साली महाजन कायद्याखाली सरकार दप्तरी नोंद करण्यात आली आहे. बार्देश तालुक्याचे मामलेदार तथा देवालय प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा कारभार सुरळीत चालू आहे.
मंदिरातील प्रमुख उत्सव
गुढी पाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी रात्री मंदिरात पुरोहितांकडून ‘संवत्सर’ (पंचांग) वाचन केले जाते.
वार्षिक साप्ताह : श्रावण अमावास्येला श्री वेताळ माऊली भूतनाथ पंचायतनचा दीड दिवसाचा सप्ताह साजरा केला जातो.
नवरात्रोत्सव : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवला सुरुवात होते. सकाळी पूजा होऊन नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे देवीला लुगडे नेसवले जाते. नऊ दिवस रात्रीचे भजन व नंतर सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात.
दसरा : अश्विन शुद्ध दशमीला मंदिरात श्री देव रवळनाथ व श्री देव भूतनाथाच्या चरणांची पूजा केली जाते. पारंपरिक गाऱ्हाणे घालून अवसारासाहित ‘श्रीं’च्या पालखी व तरंगासोबत सीमेवर आपट्याच्या झाडाकडे प्रयाण करतात. तेथे सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो.
दिवजोत्सव : कार्तिकी अमावास्येला रात्री महाजन सुवासिनींतर्फे दिवजा पेटवून सर्व मंदिरांना सुवासिनी फेऱ्या मारतात. प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता होते.
जत्रोत्सव : श्री वेताळ माऊली भूतनाथ पंचायतनचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला साजरा केला जातो. त्याप्रीत्यर्थ देवस्थानात सकाळी लघुरुद्र, आरती, तीर्थप्रसाद व श्री माऊली चरणी ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. रात्री ११.३० वा. ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक काढली जाते. दशावतारी नाट्यप्रयोग सादर करून पहाटे गवळणकाल्याने जत्रोत्सवाची सांगता होते.
वर्धापनदिन : श्री वेताळ माऊली भूतनाथ पंचायतन संस्थानचा प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन माघ शु. नवमीला सुरुवात करून दशमीला साजरा केला जातो. याप्रीत्यर्थ पूजा-अर्चा, हवन आदी कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी माघ शु. दशमीला सकाळी पूजा-अर्चा, हवन, दुपारी दान केलेल्या साहित्याची पावणी, आरती, महाप्रसाद होतो. संध्याकाळी गावातील व गावाबाहेरील सुवासिनींतर्फे दीप ओवाळणीचा कार्यक्रम होतो. रात्री कलाप्रेमींतर्फे नाट्यप्रयोग सादर केला जातो.
कळसोत्सव : श्री वेताळ माऊली भूतनाथ पंचायतनच्या कळसोत्सवाला होळीच्या सहाव्या दिवशी सुरुवात होते. कळसोत्सवास श्री वेताळ मंदिरातून प्रारंभ होतो. देवी माऊलीचा कळस संपूर्ण गावात (वाड्यावर) फिरून कळसाची प्रत्येक वाड्यावर पूजा केली जाते. तेथे ओटीरूपात येणाऱ्या साहित्याची पावणी केली जाते. वाजत-गाजत संपूर्ण गाव फिरून दुसऱ्या दिवशी पहाटे कळसाचे अंधारासहित मंदिरात आगमन होते. माऊली देवीच्या कळसोत्सवास १९६९ साली सुरुवात झाली होती. आजतागायत हा उत्सव अखंडितपणे सुरू आहे.