गोव्याचे आणि गोमंतकीयांचे भाग्य म्हणजे गोव्यातील श्रद्धास्थाने असलेली वेगवेगळ्या देवतांची मंदिरे. असेच गोव्यातील प्रसिद्ध मंदिर म्हणजे जागृत देवस्थान असलेले खोब्रावाडा, कळंगूट येथे समुद्र किनारी असलेले श्री बाबरेश्वर देवस्थान. श्री देव बाबरेश्वराची जत्रा ‘केळीच्या घडाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

समुद्रकिनारी निसर्गमय आणि थंड वातावरणात असलेल्या श्री बाबरेेश्वर मंदिरात आल्यानंतर मन प्रसन्न आणि शांत होते. मंदिरात वास्तव्यास असणारा देव म्हणजे श्री बाबरेश्वर. हा देव गावाचा राखणदार, लोकांना पावणारा, सांभाळणारा, हाकेला धावून येणारा आहे. हाकेला धावणारा श्री देव बाबरेश्वर समुद्रकिनारी रेतीच्या आवारात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आतल्या भागात श्री देव बाबरेश्वर देवाचे झाड आहे. असे म्हटले जाते की, हे झाड श्री देव बाबरेश्वराचे प्रतीक आहे. श्री देव बाबरेश्वराची पूजा झाल्यानंतर या झाडाची आणि पेडाची पूजा केली जाते. १०० वर्षांहून जास्त जुने असलेले हे मंदिर आहे.
केळीचा घड अर्पण करून नवस फेडण्याची पद्धत
श्री बाबरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव देश-विदेशांत ‘केळीच्या घडाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. जत्रोत्सवाच्या काळात मंदिराच्या चारही बाजूंनी केळीच्या घडांची सजावट केली जाते. ही सजावट बघण्याची मजा काही औरच असते. जत्रेला भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यानंतर देवाला केळीचा घड अर्पण करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि विदेशांतूनही भाविक जत्रोत्सवात उपस्थित राहतात. कुणाला मुल-बाळ नाही, कुणाचे काम होत नाही, कुणाला नोकरी नाही, कुणाचे प्रोमोशन व्हायचे असेल तर श्री देव बाबरेश्वराला नवस बोलतात. आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर केळीचा घड अर्पण करतात. काही श्रद्धाळूंना तर साक्षात श्री देव बाबरेश्वराच्या रूपाचे दर्शनदेखील घडले आहे.
जत्रोत्सवात दररोज श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन
श्री देव बाबरेश्वर देवस्थानच्या जत्रोत्सवातील सात दिवसांत पाच ते सात हजार केळीचे घड देवाला अर्पण केले जातात. पहिल्याच दिवशी सुुमारे २००० घड अर्पण केले जातात. जत्रेच्या दिवशी सकाळी लघुरुद्र आणि देवाची पूजा केली जाते. दुपारी महाप्रसाद असतो. रोज सहा दिवस श्री सत्यनारायण महापूजा बांधली जाते. घडांची पावणी केली जाते. पावणीला हजारो लोक उपस्थित राहून देवाचा घड आशीर्वाद म्हणून ‘श्री देव बाबरेश्वरा, पाव रे बाबा’ म्हणत आनंदाने घरी नेतात.
सध्या देवस्थानच्या संस्थानचे अध्यक्षपद चंद्रकांत (चानू) चोडणकर सांभाळत आहेत. कुलदेवी श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण, नानोडा; कळंगूट तसेच सर्व देवतांच्या कृपेने श्री देव बाबरेश्वर मंदिराची पायाभरणी मान्यवरांच्या हस्ते झाली होती. यंदा मंदिर पूर्णत्वास आले असून येथे श्री देव बाबरेश्वराच्या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना झाली आहे.
चंद्रकांत (चानू) चोडणकर,
अध्यक्ष, श्री देव बाबरेश्वर देवस्थान, कळंगूट