मनोकामना पूर्ण करणारा करमलघाटचा श्रीशक्ती गणपती

काणकोण तालुक्यातील करमल घाटामधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच श्रीशक्ती गणपतीचे मंदिर अाहे. गोव्याच्या विविध भागांतून आवर्जून भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंदिरात महापूजा बांधली जाते.

Story: देवभूमी गोवा |
15th May, 07:35 pm
मनोकामना पूर्ण करणारा  करमलघाटचा श्रीशक्ती गणपती

खोलवर दरी, विविध प्रकारच्या झाडांची आरास, थंडगार हवामान, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला डोंगर, ज्या घाटाला करमलाच्या झाडांनी वेढले आहे, तो करमलघाट. चोही बाजूंनी हिरव्या जंगलाने नटलेला डोंगर, असा करमलघाट व त्या घाटाच्या मधून गेलेला राष्ट्रीय महामार्ग. या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच श्रीशक्ती गणपती मंदिर असून, हे मंदिर काणकोणच्या चावडीहून ६ किलोमीटर, तर मडगावहून ३० किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही बाजूने ये-जा करणारे पर्यटक, वाहतूकदार या देवाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. या देवाचे दर्शन घेण्यासाठी फक्त काणकोणवासीय करमलघाटावर जात नाहीत, तर गोव्याच्या विविध भागांतून आवर्जून भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या देवाची महती आता देश-विदेशांतही पोहोचली अाहे. काणकोणमधील ज्या व्यक्ती देशाच्या इतर भागात वा विदेशात असतात, त्यासुद्धा वेळात वेळ काढून आपण मागितलेले नवस फेडण्यासाठी येथे आवर्जून येतात. मनोकामना पूर्ण होण्यासाठी ज्यांनी या देवाला नवस केला, त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानेच भक्तांची श्रद्धा अधिकच बळकट झालेली पाहायला मिळत आहे.

२००५ साली सुदी चंदन हा मूळचा केरळचा व पाळोळे येथे व्यवसाय करणारा व्यापारी पहाटे आपल्या गाडीने मडगावला जात असताना त्याला करमलघाट येथे श्री गणपतीची मूर्ती असल्याचा भास झाला. पहाटेची वेळ व अंधार असल्याने त्याने आपली गाडी थांबवून गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात श्री गणपतीची मूर्ती पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला एका झाडाच्या फांदीत श्री गणपतीची सोंड दृष्टीस पडली. दुसऱ्या दिवसापासून सुदी चंदन यांनी करमलघाट येथे थांबून त्या झाडाला फुले वाहणे, तेथे अगरबत्ती लावणे सुरू केले.

हळूहळू मडगावहून काणकोणला व काणकोणहून मडगावला जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी चालकांनी तेथे गाड्या थांबवून देवाचे दर्शन घेणे सुरू केले. काही प्रवासी गाड्याही तेथे थांबू लागल्या. नंतर श्री गणेशभक्त संजय गावस देसाई, संजय सुभाष देसाई, उदेश ऊर्फ उदय देसाई, संतोष गावकर, धनंजय देसाई व इतरांनी पुढाकार घेऊन देवाची नित्य पूजा करण्याच्या दृष्टीने भटजींची व्यवस्था केली. नित्यनेमाने दर मंगळवारी व इतर दिवशी तेथे पूजा होऊ लागली. भाविक आपल्या समस्या देवापुढे मांडू लागले. समस्यांचे निराकरण होत असल्याच्या अनुभूती त्यांना येऊ लागल्या. त्याची महती लोकांपर्यंत पोहोचल्याने, अडचणी दूर होऊ लागल्याने भक्तांची श्रद्धा वाढू लागली.

हळूहळू तेथे गर्दी वाढू लागली. उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक मंगळवारी वेगवेगळ्या भक्तगणांकडून ‘श्रीं’ची पूजा बांधणे सुरू झाले. श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी येथे महापूजा बांधली जाते. भक्तगणांना प्रसादाबरोबरच महाप्रसादही दिला जातो. याचा हजारो भाविक लाभ घेत आहेत.

भक्तगणाकडून निधी येतो, तो पूजेसाठी व इतर सामग्रीसाठी खर्च करतानाच कोणी गरीब अडीअडचणीत सापडला असेल तर त्याला मदत म्हणून किंवा गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी हा निधी देण्यात येतो. काणकोणमधील गोशाळा, श्री मल्लिकार्जुन देवस्थानला, तसेच दरवर्षी काणकोणमधून पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील भाविकांसाठी मदत म्हणून निधी दिला जातो. काणकोण परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवाची महती आता सर्वत्र झाली आहे.