गोव्यात एफआरआरओची कारवाई; मे महिन्यात ९ विदेशी नागरिकांना पाठवले देशाबाहेर

मांद्रे येथे आणखी ७ जण सापडले; कारवाई सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोव्यात एफआरआरओची कारवाई; मे महिन्यात ९ विदेशी नागरिकांना पाठवले देशाबाहेर

पणजी : गोव्यात मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांविरोधात विदेशी प्रभागीय नोंदणी कार्यालयाच्या (एफआरआरओ) (Foreigners Regional Registration Office) गोवा विभागाने कठोर कारवाई सुरू ठेवली आहे.  या मे  महिन्यात आतापर्यंत ९ विदेशी नागरिकांना देशाबाहेर पाठविण्यात आले आहे. तर गुरुवारी मांद्रे येथे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मुदत संपूनही वास्तव्य करून असलेले ७ विदेशी नागरिक सापडले.  

मांद्रे (Mandrem)  येथे झालेल्या तपासणी मोहिमेत ५ रशियन, १ युक्रेनियन आणि १ दक्षिण आफ्रिकन नागरिक व्हिसा मुदत संपल्यानंतरही भारतात (India) वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मे २०२६ दरम्यान देशाबाहेर पाठविण्यात आलेल्या ९ विदेशी नागरिकांमध्ये ५ युगांडाचे, ३ रशियन आणि १ नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांविरोधात दीर्घकालीन कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.  त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

यावर्षी आतापर्यंत २७ विदेशी नागरिकांवर कारवाई 

एफआरआरओच्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत मुदत संपूनही गोव्यात वास्तव्य करूनही राहिलेल्या विविध देशांतील २७ विदेशी नागरिकांना भारताबाहेर पाठवण्यात आले आहे. २०२५ मध्ये गोव्यातून तब्बल १२० विदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये २९ बांगलादेशी नागरिकांचाही समावेश होता. ही संपूर्ण मोहीम वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एफआरआरओ पोलीस निरीक्षक देवेंद्र यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून राबविण्यात आली. 

संबंधितांना आवाहन 

दरम्यान, एफआरआरओ गोव्याने हॉटेल मालक, गेस्ट हाऊस चालक, होमस्टे सेवा पुरवठादार, घरमालक आणि इतर निवास सुविधा देणाऱ्यांना विदेशी नागरिकांची माहिती वेळेत आणि अचूकपणे सी-फॉर्म/फॉर्म ३ (C-Form/Form III) द्वारे सादर करण्याचे आवाहन केले आहे. माहिती सादर करण्यात विलंब किंवा दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही एफआरआरओने दिला आहे.