कोलवा येथील रिलायन्स पार्कमध्ये घटना

मडगाव : लिफ्ट येण्यापूर्वीच ती खाली आल्याचे समजून आत पाऊल टाकल्याने झालेल्या अपघातात ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कोलवा येथील रिलायन्स पार्क इमारतीत घडली. मार्सिया रोसा पाशेको (रा. चंद्रवाडा, फातोर्डा) असे मृत महिलेचे नाव असून त्या सेवानिवृत्त डॉक्टर होत्या.
गुरुवारी मार्सिया या कोलवा येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेल्या होत्या. मित्र पहिल्या मजल्यावर राहत असल्याने त्यांनी लिफ्टचे बटण दाबले. लिफ्ट खाली आली आहे असे समजून त्यांनी दरवाजा उघडून आत पाऊल टाकले. प्रत्यक्षात लिफ्ट वरच्या मजल्यावर होती. त्यामुळे मार्सिया थेट लिफ्टच्या मोकळ्या जागेत (शाफ्टमध्ये) कोसळल्या. त्याच वेळी लिफ्टही वेगाने खाली येत होती. त्या खाली कोसळल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने धाव घेत लिफ्ट बंद केली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र लिफ्टची धडक बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कोलवा पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल कृष्णा या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.