एका वर्षाने गोव्यात परतल्यानंतर पणजी पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पणजी: बनावट सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज लाटत बँकेची फसवणूक करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात पणजी पोलिसांना मोठे यश आले आहे. संशयित महिलेने पणजी येथील 'सीएसबी बँके'त १६ बनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून तब्बल ७ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज घेत बँकेचे आर्थिक नुकसान केले होते. या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१६(४), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून ही महिला पोलिसांना गुंगारा देत होती.
तपासादरम्यान या संशयित महिलेची ओळख जन्नत हनबरकदादी (करंजाळे, मुळ-मोरादाबाद, उत्तर प्रदेश) अशी पटली होती. गुन्हा केल्यापासून ती गोव्याबाहेर पळून गेली होती आणि उत्तर प्रदेशात लपून बसली होती. दरम्यान, ही संशयित महिला पुन्हा गोव्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पणजी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तिच्या संभाव्य हालचालींवर कडक पाळत ठेवली आणि ती गोव्यात येताच तिला अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन पणजी पोलीस स्थानकात आणले
.
पोलीस कोठडीत घेतल्यानंतर तिची सखोल चौकशी करण्यात आली. या गुन्ह्यात तिचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध करणारे पुरेसे आणि ठोस पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी तिला रीतसर अटक केली आहे. ही कारवाई उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर व पणजीचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर, उपनिरीक्षक नितीन नाईक, पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश मळीक, मिनेश नाईक आणि प्रसन्न मंगेशकर यांच्या पथकाने केली. या प्रकरणात पुढील सखोल तपास सुरू आहे.