चोडण येथे घरात इन्व्हर्टरचा स्फोट; ५५ वर्षीय महिलेचा गुदमरून मृत्यू

दोन्ही मुलांवर गोमेकॉत उपचार सुरू; प्रकृती स्थिर.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18 mins ago
चोडण येथे घरात इन्व्हर्टरचा स्फोट; ५५ वर्षीय महिलेचा गुदमरून मृत्यू

पणजी: चोडण येथील खैराटवाडा भागात शनिवारी पहाटे एका घरातील इन्व्हर्टरचा शॉर्ट सर्किटमुळे स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत एका ५५ वर्षीय महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून बेशुद्ध पडलेल्या तिच्या दोन मुलांवर बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीत वळवईकर यांच्या घराचे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शनिवारी सकाळी ६.१० च्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी सपना वळवईकर (५५) आणि त्यांची दोन मुले समृद्धी वळवईकर (२४) व साइतेज वळवईकर (१७) गाढ झोपेत होते. अचानक घरातील इन्व्हर्टरचा शॉर्ट सर्किटमुळे मोठा ब्लास्ट झाला आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. संपूर्ण घरा धुराचे प्रचंड लोट पसरल्याने आणि झोपेत असल्यामुळे कुणालाच बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यानंतर धूर फुफ्फुसात गेल्याने दोन्ही मुले घटनास्थळीच बेशुद्ध पडली.

घराला लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांसह अग्निशमन दलाला पाचारण केले. डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत सपना वळवईकर यांचा मृत्यू झाला होता. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोन्ही गंभीर जखमी मुलांना तातडीने उपचारासाठी गोमेकॉ रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. जुने गोवे पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक लॉरेन्स सिक्वेरा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा