शिक्षकांची बदली रद्द न केल्यास ६ जूनपासून हायस्कूलवर बहिष्कार

पालकांनी पत्रकार परिषदेत दिला इशारा


16th May, 11:41 pm
शिक्षकांची बदली रद्द न केल्यास ६ जूनपासून हायस्कूलवर बहिष्कार

पत्रकार परिषदेला उपस्थित उल्हास गावकर, श्रीकांत गावकर व इतर. (संजय कोमरपंत)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : गावडोंगरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक सागर वेळीप यांची नेत्रावळी येथे, तर शारीरिक शिक्षक यशवंत गावकर यांची खोतीगाव विद्यालयात बदली करण्यात आली आहे. गावडोंगरी विद्यालयात विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यात या दोन्ही शिक्षकांचा सिंहाचा वाटा असून विद्यार्थीप्रिय दोन्ही शिक्षकांच्या बदलीचा आदेश रद्द न केल्यास ६ जूनपासून पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, असा इशारा गावडोंगरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उल्हास भिवा गावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत गावकर व पांडुरंग गावकर यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
गावडोंगरी येथील सरकारी माध्यमिक शाळेत १७० विद्यार्थी असून पाच वर्षांपासून या विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागत आहे. विद्यालयात फक्त चार शिक्षक कायमस्वरूपी असून इतर शिक्षक कंत्राटपद्धतीवर काम करत आहेत. कायमस्वरुपी शिक्षकांमधील मुख्याध्यापक सागर वेळीप आणि शारीरिक शिक्षक यशवंत गावकर यांची बदली करून सदर विद्यालय बंद पाडण्याचे षडयंत्र आहे. परिसरात राजकारण्यांच्याही शाळा आहेत. सरकारी शाळा बंद पाडून आपल्या शाळेत पटसंख्या वाढविण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप उल्हास गावकर, श्रीकांत गावकर यांनी केला.
दोन्ही शिक्षकांची बदली रद्द करावी, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री, क्रीडा संचालक व संबंधितांना पाठविण्यात आले आहे, असेही उल्हास गावकर यांनी सांगितले. काणकोणमधील कित्येक शाळा बंद पडत आहेत. गावडोंगरीतील सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी शाळेच्या पालकांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे, असे काणकोणचे माजी नगरसेवक शुभम कोमरपंत यानी सांगितले. शाळेच्या शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कोमरपंत यांनी सांगितले.      

हेही वाचा