पत्रकार परिषदेत सदस्यांचा दावा : अंतर्गत कलह चव्हाट्यावर

पणजी : रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) कार्यकारिणी समितीत पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय झाल्याचा मोठा खुलासा पक्षाच्या संस्थापक आणि कार्यकारिणी सदस्यांनी केला आहे. पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला असून, पक्ष पुढे चालू राहावा आणि बंद होऊ नये, अशी मागणी या सदस्यांनी केली आहे.
आरजीपीमध्ये सध्या पक्षाध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांबाबत अधिक माहिती देण्यासाठी पक्षाच्या सदस्यांनी पणजीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी कार्यकारिणी सदस्य प्रेमानंद गावडे आणि कॅन्डिदो कोरेय्या तसेच संस्थापक सदस्य प्रशांत पागी आणि विशाल देसाई उपस्थित होते.
सुरुवातीला पर्यावरण आणि बिगर गोमंतकीयांचा मुद्दा घेऊन आरजीपीने २०१९ मध्ये काम सुरू केले आणि पक्षाला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ‘रेव्होल्युशनरी’ने स्वतःचा व्यवसाय व काम बाजूला ठेवून पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचवली आणि त्यातून पक्षाला १० टक्के मतांची टक्केवारी मिळून वीरेश बोरकर विधानसभेत पोहोचले, असे प्रशांत पागी यांनी सांगितले.
निवडून आल्यानंतर वीरेश बोरकर यांनी अध्यक्षपद सोडून ते मनोज परब यांच्याकडे दिले आणि त्यानंतर परब यांनी संपूर्ण कार्यकारिणी समितीत बदल केले. पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतल्याने सध्याची कार्यकारिणी समितीच सर्वोच्च ठरली असून, याच समितीने पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याने धक्का बसला, असा दावा प्रशांत पागी यांनी केला.
गेल्या दोन कार्यकारिणी बैठकींमध्ये केवळ सदस्यांना बाहेर काढण्याचे काम झाले. मागील बैठकीत ज्युलियस आल्मेदा यांना पक्षातून काढण्याचा निर्णय झाल्याने सांत आंद्रे विभाग नाराज झाला. याबाबत सविस्तर चर्चा करून कार्यकारिणी सदस्य मयूर आर्सेकर यांनी ज्युलियस आल्मेदा यांच्याशी संवाद साधण्याचा सल्ला मनोज परब यांना दिला होता, मात्र त्यांनी संतापून ज्युलियस यांना पक्षाबाहेर काढले, असा आरोप प्रेमानंद गावडे यांनी केला.
पक्षाची वाढ होत नसल्याने आणि कार्यकर्ते इतर कामांत व्यस्त असल्याने त्यांना रस राहिलेला नाही, असे सांगत २० पैकी १५ सदस्यांनी पक्ष विसर्जनाला पाठिंबा दिला, अशी माहिती कार्यकारिणी सदस्य कॅन्डिदो कोरेय्या यांनी दिली.
पक्षासंदर्भातील इतके मोठे निर्णय घेण्याचा अधिकार कार्यकारिणी समितीला नाही आणि असे निर्णय पक्षाच्या तळागाळातील सदस्यांशी चर्चा करून घ्यायला हवेत. गेल्या तीन वर्षांत पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नाही, त्यामुळे ती तातडीने घेऊन कार्यकर्त्यांचे मत जाणून घ्यावे, अशी मागणीही कॅन्डिदो कोरेय्या यांनी केली.