कुळे, फोंडा, कुडचडे पोलिसांची दमछाक

फोंडा : धारबांदोडा तालुक्यातील दूधसागर नदीवर आंघोळीसाठी गेलेल्यांना हुसकावून लावताना कुळे, फोंडा आणि कुडचडे पोलिसांची धावपळ उडाली.
गेल्या रविवारी एका आयआयटी विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर उपाय काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी अतिमेश शिरवईकर व मामलेदार मनोज कोरगावकर यांनी कुळे, फोंडा आणि कुडचडे पोलीस निरीक्षक व विविध पंचायतीच्या सरपंचाची बैठक घेऊन शनिवारी व रविवारी नदीवर गस्त वाढविण्याचा आदेश दिला होता. मात्र, रविवारी जलस्रोत खात्याने आंबे-दाबाळ येथील बंधाऱ्याच्या प्लॅट्स काढण्याचे काम सुरू केल्याने शिगणेव्हाळ-निरंकाल, कोडार, ओकांब व ओपा भागात पाण्याची पातळी वाढलेली दिसून आली.
शिगणेव्हाळ-निरंकाल आणि आंबे-दाबाळ येथील बंधाऱ्याजवळ रविवारी सकाळपासून लोकांची आंघोळीसाठी गर्दी दिसून आली. माहिती मिळाल्यावर फोंडा पोलिसांनी दोन्ही ठिकाणी जाऊन लोकांना हुसकावून लावले. यावेळी काही जणांनी नदीजवळ जेवण तयार करण्यासाठी चूल पेटवल्याचे दिसून आले. शिगणेव्हाळ येथे नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कित्येक दिवसांपासून मोठ्या संख्येने लोक आंघोळीसाठी येत आहेत. पण रविवारी पोलिसांनी नदीवर आलेल्या लोकांना हुसकावून लावले. त्यामुळे स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले.
ताकार- दावकोण येथील बंधाऱ्याच्या प्लेट्स काही दिवसांपूर्वी जलस्रोत खात्यातर्फे काढल्यामुळे लोकांनी आंबे- दाबाळ येथील बंधाऱ्यावर गर्दी केली होती. माहिती मिळाल्यावर गस्तीवर असलेल्या फोंडा पोलिसांनी धाव घेऊन लोकांना तेथून हुसकावून दिले.
प्लेट्स काढण्यापूर्वी जलस्रोत खात्याने लोकांना माहिती द्यावी!
जलस्रोत खात्याने दूधसागर नदीवरील विविध बंधाऱ्याच्या प्लेट्स काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खालच्या भागात पाण्याच्या पातळीत वाढ दिसून आली. गेल्या वर्षी एका युवकाचा नदीत आंघोळ करताना बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे बंधाऱ्याच्या प्लेट्स काढण्यापूर्वी जलस्रोत खात्याने लोकांना माहिती देण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.