अर्जुन साबूवर केरळ येथे होणार अंत्यसंस्कार

मृतदेह वडिलांनी घेतला ताब्यात : अर्जुनने बुधवारी घेतला होता टाेकाचा निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
अर्जुन साबूवर केरळ येथे होणार अंत्यसंस्कार

वास्को : आयुष्याला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या अर्जुन साबू (२६) याचा मृतदेह वडिलांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतला. त्याच्यावर केरळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले.

अर्जुन साबू हा बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पीचडीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. तो बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये न राहता काही अंतरावर असलेल्या एका इमारतीमध्ये भाड्याने राहत होता.

अर्जुन साबू हा बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पीचडी करण्यासाठी आल्यावर तो काही दिवस कॅम्पसमध्ये राहत होता. परंतु, त्यानंतर तो एका इमारतीमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. या इमारतीतील तीन बेडरूम असलेल्या फ्लॅटमध्ये तो राहत होता. त्या तीन बेडरुमपैकी एका बेडरुममध्ये अर्जुन राहत होता. अर्जुन साबू याच्याकडे घरकाम करण्यासाठी एक महिला येत असे. अर्जुन याने आपल्या खोलीत मंगळवारी रात्री किंवा बुधवारी मध्यरात्री गळफास घेतला असावा. बुधवार, १३ रोजी सकाळी अकराच्या दरम्यान काम करणारी महिला आली असता तिला त्या फ्लॅटचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. त्यामुळे तिने आपल्याकडील चावीने दार उघडले असता, अर्जुन याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी तिने शेजाऱ्यांना माहिती दिल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी अर्जुनच्या मृत्युप्रकरणी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविला. आत्महत्या करण्यापूर्वी अर्जुन याने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये मला जीवनाचा कंटाळा आला असल्याने मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्युप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नयेत, असे लिहिले आहे. अर्जुनसारखा हुशार मुलगा मानसिक तणावाखाली होता की आणखी दुसरे कारण आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

या आत्महत्येमुळे बिट्स पिलानी कॅम्पसचे व्यवस्थापन व शिक्षक वर्गही गोंधळून गेले आहेत. यापूर्वी त्या कॅम्पसमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तथापि, अर्जुनची गोष्ट निराळी आहे. तो बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पीचडीच्या दुसऱ्या वर्षाचा अभ्यास करीत होता. तो सज्ञान व उच्च शिक्षित असल्याने त्याच्यावर अभ्यासाचा कोणताही तणाव नसावा. यामुळे त्याने आत्महत्या का केली? याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे.


हेही वाचा