मध्यप्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ३ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
मध्यप्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट;  ३ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी

भोपाळ : मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यातील (Dewas district ) टोंककलां परिसरात गुरुवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटानंतर (explosion at a firecracker factory in Madhya Pradesh)  आग लागून ३ कामगारांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून; प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली. जखमींपैकी अती नऊ जणांची प्रकृती अती गंभीर असल्याने त्यांना इंदूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

देवासचे जिल्हाधिकारी ऋतुराज सिंह यांनी सांगितले की, या कारखान्यात लहान फटाक्यांच्या निर्मितीचे काम अवघ्या १५ दिवसांपूर्वी सुरू झाले होते. संबंधित युनिटचा परवाना अनिल मालवीया यांच्या नावावर जारी करण्यात आला होता. कारखान्यातील दुसऱ्या ठिकाणी साठवून ठेवलेले स्फोटक साहित्य प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, स्फोट इतका भीषण होता की मृतांच्या अवयवांचे तुकडे घटनास्थळापासून दूरवर विखुरले गेले. तसेच कारखान्याच्या परिसरात अद्याप बांधकाम सुरू होते आणि विविध शेड उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा