राजस्थान, मध्यप्रदेशात उष्णतेची तीव्र लाट

नवी दिल्ली : देशभरात सध्या हवामानाचे दोन टोकाचे प्रकार अनुभवायला मिळत आहेत. उत्तर भारतात वादळ आणि उष्णतेने जनजीवन विस्कळीत केले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, अयोध्येसह ३० जिल्ह्यांमध्ये बुधवारी आलेल्या भीषण वादळामुळे (strong storm and heavy rain in Uttar Pradesh) तब्बल ९४ जणांचा मृत्यू झाला.
प्रयागराजमध्ये सर्वाधिक १७ तर भदोही जिल्ह्यात १५ जणांचा बळी गेला. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब आणि पत्र्यांच्या शेड्स कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. बरेली येथे ताशी ८० किमी वेगाने आलेल्या वादळाने अक्षरशः हाहाकार माजवला. एका तरुणाला पत्र्याच्या शेडसकट हवेत उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली. राज्यातील बांदा येथे तापमान ४५.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, आज ५१ जिल्ह्यांसाठी मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
भदोहीत झाड कोसळून महिला व दोन मुलींचा मृत्यू
भदोही जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचे खांब कोसळले. सुरियावान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरगसेनपट्टी येथे घरावर झाड कोसळल्याने एका महिलेचा आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. औराई परिसरातही झाडाखाली दबून अनेकांनी प्राण गमावले. या नैसर्गिक आपत्तीत १६ जनावरांचाही मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत.
राजस्थानात उष्णतेचा कहर; जैसलमेर सर्वाधिक तापले
दुसरीकडे राजस्थानमध्ये प्रचंड उष्णतेची लाट कायम आहे. सलग चौथ्या दिवशी जैसलमेर हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून, तेथे तापमान ४६.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बिकानेर, जोधपूर, जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातही तापमानाचा पारा चढला
मध्यप्रदेशातील २३हून अधिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. ही परिस्थिती १८ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. खजुराहो येथे बुधवारी तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. इंदूर, उज्जैन, धार आणि रतलाममध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रात्रीचे तापमानही वाढण्याची शक्यता आहे.
हरियाणा, बिहार आणि उत्तराखंडमध्येही हवामानाचा इशारा
हरियाणात गेल्या २४ तासांत तापमानात १.१ अंशांनी वाढ झाली असून, नारनौल येथे तापमान ४२.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. राज्यात १७ मेपासून उष्णतेच्या लाटेमुळे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बिहारमधील पूर्णिया, कटिहारसह सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उत्तराखंडच्या डोंगराळ भागांत आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.