महिलांनी नोकरी शोधण्यापेक्षा 'नोकरी देणाऱ्या' उद्योजिका बनावे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
37 mins ago
महिलांनी नोकरी शोधण्यापेक्षा 'नोकरी देणाऱ्या' उद्योजिका बनावे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी: गोव्यातील महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे, त्यांनी केवळ नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न न करता, इतरांना नोकरी देणाऱ्या यशस्वी उद्योजिका बनावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. पणजी येथील लोकभवन येथे नीती आयोग आणि ग्रामीण विकास खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वूमेन आंत्रेप्रीनरशिप प्लॅटफॉर्म' (WEP) च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले की, गोवा सरकार महिलांना उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे. 'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेच्या माध्यमातून राज्यात दूध, भाजीपाला, मासे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, सरकारच्या स्टार्टअप धोरणांतर्गत नवीन उद्योजिकांसाठी १० लाख रुपयांच्या अनुदानाची तरतूद असून, महिलांनी या संधीचा लाभ घेऊन व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. महिलांनी केवळ पारंपारिक व्यवसायांवर अवलंबून न राहता नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या 'वूमेन आंत्रेप्रीनरशिप प्लॅटफॉर्म'च्या संचालक अॅना रॉय यांनी प्लॅटफॉर्मच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. महिला उद्योजकांसाठी आगामी एका वर्षाचा विशेष 'एजेंडा' तयार करण्यात आला असून, यामध्ये गोव्याच्या पारंपारिक व्यवसायांना आणि हस्तकलेला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. ग्रामीण विकास आणि उद्योजकता यांचा मेळ घालून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या नवीन व्यासपीठामुळे गोव्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आपल्या कल्पनांचे रूपांतर व्यवसायात करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा