गेल्या एक महिन्यापासून बनावट फेसबुक आयडीवरून आमदारांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप

पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीमधील अंतर्गत वाद आता विकोपाला पोहोचला आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब, सरचिटणीस विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांनी आमदार विरेश बोरकर यांच्या विरोधात केलेल्या विधानांचा 'आरजीपी सांत आंद्रे ब्लॉक'ने अधिकृत पत्राद्वारे तीव्र निषेध केला. या पत्रामुळे पक्षातील फूट आता उघडपणे समोर आली असून, कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
सांत आंद्रे ब्लॉकने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मनोज परब आणि इतर नेत्यांनी आमदार विरेश बोरकर, त्यांचे स्वीय सहाय्यक लिसियो रोन्कोन आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेली विधाने आणि आरोप बदनामीकारक आणि बिनबुडाचे आहेत. गेल्या एक महिन्यापासून आमदारांना बनावट फेसबुक अकाउंटवरून टार्गेट केले जात असतानाही पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप ब्लॉकने केला आहे. तसेच, केंद्रीय कार्यकारिणीने (CEC) संपूर्ण सांत आंद्रे ब्लॉकवर केलेल्या आरोपांमुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, जोपर्यंत हे सर्व मतभेद सामोपचाराने सुटत नाहीत, तोपर्यंत आमदार विरेश बोरकर यांनी 'सीईसी'च्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू नये, अशी विनंती ब्लॉक कमिटीने केली आहे. मनोज परब यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून त्यांना हा वाद सोडवण्याची इच्छा नसल्याचे दिसते, असेही या पत्रात म्हटले आहे.
दुसरीकडे, या वादाच्या केंद्रस्थानी असलेले पक्षाचे नेते ज्युलियस अल्मेडा यांनी आगशी येथील पिलार जंक्शनवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी त्यांना गाठले असता, त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. सध्या फेसबुकवर जे काही सुरू आहे, ते सर्व लोक पाहत आहेत. सध्याच्या परिस्थितीवर मी कोणतीही विशेष कमेंट करणार नाही, असे सांगत त्यांनी सध्या केवळ कामावर लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट केले.
पक्षासाठी दिवसरात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये निर्माण झालेला हा दुरावा आरजीपीच्या भविष्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पक्षाशी निष्ठा असल्याचे जरी कार्यकर्ते सांगत असले, तरी नेतृत्वावर असलेल्या अविश्वासामुळे गोव्याच्या राजकारणातील या नव्या शक्तीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.