काशिनाथ शेट्ये यांची पीआय, पीएसआय विरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार

चुकीचा गुन्हा नोंदवल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th May, 11:37 pm
काशिनाथ शेट्ये यांची पीआय, पीएसआय विरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार

पणजी : चुकीच्या तक्रारीनंतर कोणतीही चौकशी न करता खोटा गुन्हा नोंदवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी जुने गोवे पोलीस निरीक्षक गौरीश मळीक, पोलीस उपनिरीक्षक संकेत पोखरे आणि योगेश तिगाडी यांच्या विरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करून पोलीस निरीक्षक गौरीश मळीक आणि उपनिरीक्षक संकेत पोखरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

८ मे २०२६ रोजी मी दुसऱ्या एका व्यक्तीसह मेरशी येथील सर्व्हे नंबर ५८/१ या जागेवर गेलो आणि तक्रारदार योगेश तिगाडी यांच्याकडे १५ लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप आपल्यावर करण्यात आला आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर तडजोड करण्यासाठी ही मागणी केल्याचे आणि त्यानंतर तिगाडी याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असा दावा शेट्ये यांनी केला.

काशिनाथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरशी येथे बेकायदेशीर मातीचा भराव टाकण्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. ही याचिका मागे घेण्यासाठी योगेश तिगाडी याने त्यांना १५ लाख रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र शेट्ये यांनी त्यास नकार दिला. ८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता शेट्ये मेरशी येथे गेले असता, योगेश तिगाडी याने त्यांना कोयता दाखवून धमकावले आणि मारहाण केली. ९ मे रोजी शेट्ये यांनी जुने गोवे पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.

तिघांवर कारवाईची शेट्ये यांची मागणी

योगेश तिगाडी याच्याशी संगनमत करून पीएसआय संकेत पोखरे आणि पीआय गौरीश मळीक यांनी हेतुपुरस्सर कारवाई केल्याचा आरोप काशिनाथ शेट्ये यांनी केला आहे. या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गुन्हे शाखेकडे केली आहे. 

हेही वाचा