
पेडणे : देऊळवाडा मांद्रे येथील प्रगतशील शेतकरी तसेच उत्कृष्ट नाट्य तथा भजनी कलाकार गुरुदास सदाशिव सातार्डेकर (६४) यांचा बुधवार दि. १३ मे रोजी घरानजीकच्या आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाला.
गुरुदास सदाशिव सातार्डेकर हे आपल्या आंब्याच्या झाडावर फांद्या कापण्यासाठी चढले होते. गुरुदास झाडावर चढल्यानंतर अचानक झाडावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने तुये येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासंबंधी मांद्रे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. संध्याकाळी त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली, मुलगे गिरीश, स्वप्नील, बंधू सुभाष तसेच भगिनी, पुतणे, पुतण्या, भाचे, भाच्या असा परिवार आहे.
गुरुदास यांनी नाटकातही उत्कृष्ट भूमिका साकार केली होती. कला, सांस्कृतिक, नाट्यामध्ये ते भाग घ्यायचे. एक चांगला कलाकार म्हणून ते परिसरात परिचित होता. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एक चांगला, गुणी, हरहुन्नरी कलाकाराला आम्ही गमावले असल्याची भावना नाट्य कलाकार प्रशांत मांद्रेकर यांनी व्यक्त केली.