केंद्रीय वीज प्राधिकरणाचा दरवाढीचा प्रस्ताव; सध्या तरी दरवाढ नसल्याचे मुख्य वीज अभियंत्यांकडून स्पष्ट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता वीजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाने (सीईए) विजेचे कायमस्वरूपी शुल्क (फिक्स्ड चार्जेस) वाढवण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे नागरिकांना वीजबिलाचा अतिरिक्त धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे. वीजदर वाढीचा प्रस्ताव संयुक्त वीज नियामक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. सुनावणी आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वीजदरवाढ लागू होईल. सध्या तरी वीजदर वाढणार नसल्याचे मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी स्पष्ट केले आहे.
वीज वितरण कंपन्यांचा खर्च वाढत असल्याने त्यावर उपाय म्हणून वीजदर वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. वीजबिलामध्ये फिक्स्ड चार्जेस, एनर्जी चार्जेस, मीटर चार्जेस आणि एफपीपीसीए चार्जेस अशा विविध प्रकारच्या आकारण्या असतात. केंद्रीय वीज प्राधिकरणाने फिक्स्ड चार्जेस वाढवण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे घरगुती, शेती आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांवर दरवाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
वीज वितरण व्यवस्था, ग्रीड तसेच मूलभूत सुविधांवरील खर्च वाढत असल्याने त्याचा भार कंपन्यांना सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपन्यांना दिलासा देण्यासाठी फिक्स्ड चार्जेस वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी झाला तरी वीजबिल वाढीव येण्याची शक्यता आहे.
मोठ्या कंपन्या आणि इमारती आता रूफटॉप सोलरचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे विजेचा वापर कमी होत असून वीज खात्याचे उत्पन्न घटत आहे. मात्र, मूलभूत सुविधा उभारण्यासाठी होणारा खर्च कमी झालेला नाही. त्यावर उपाय म्हणून फिक्स्ड चार्जेस वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या वर्षी वीजदरवाढ करण्यात आली होती. तसेच स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रस्तावालाही विरोध सुरू आहे. मात्र, मुख्य अभियंत्यांनी सध्या वीजदरवाढ होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर इतर वस्तूंचे दरही वाढू लागले आहेत. त्यातच वीजदरवाढ झाली तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वीजदरवाढीची याचिका संयुक्त वीज नियामक आयोगाकडे (जेईआरसी) सादर करावी लागेल. त्या याचिकेला मंजुरी मिळाल्यानंतरच वीजदरवाढ लागू होईल. त्याआधी कोणतीही वाढ होणार नाही.
_ स्टीफन फर्नांडिस, मुख्य वीज अभियंता