तिरुमला तिरुपती सोसायटीला सशर्त ‘ना हरकत दाखला’ मंजूर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
तिरुमला तिरुपती सोसायटीला सशर्त ‘ना हरकत दाखला’ मंजूर

पणजी : तिरुमला तिरुपती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला गोव्यातील त्यांच्या सध्या सुरू असलेल्या शाखांचा कारभार पुढे चालू ठेवण्यासाठी सहकार खात्याने सशर्त ‘ना हरकत दाखला’ मंजूर केला आहे. सोसायटीने आवश्यक ते सर्व ऑडिट अहवाल आणि कायदेशीर कागदपत्रे सरकारकडे सादर केल्यामुळेच ही परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. मात्र, सोसायटीला सध्यातरी राज्यात कोणत्याही नवीन शाखा सुरू करता येणार नाहीत, असेही सहकार मंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
यापूर्वी तिरुमला तिरुपती सोसायटीने गोव्यात नवीन शाखा उघडण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती आणि सरकारने ती दिलीही होती. मात्र, सोसायटीने गेल्या काही वर्षांचे ऑडिट अहवाल सहकार खात्याकडे सादर केले नसल्याचे नंतर समोर आले. या गंभीर त्रुटीमुळे सरकारने तत्काळ कारवाई करत सोसायटीची एनओसी रद्द केली होती.
सरकारने एनओसी रद्द केल्याची बातमी पसरताच गोव्यातील हजारो ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठी लोकांनी सोसायटीच्या विविध शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती.
या चर्चेनंतर सोसायटीने सर्व प्रलंबित कागदपत्रे आणि अंतिम ऑडिट अहवाल सहकार खात्याकडे सुपूर्द केले. या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सरकारने आपली स्थगिती उठवून एनओसी बहाल केली आहे. सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मंजुरी केवळ सध्या कार्यरत असलेल्या शाखांचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी असून, नवीन शाखा विस्तार करण्यासाठी सोसायटीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. या निर्णयामुळे गोव्यातील ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा