आज चार वाजता पुन्हा बोलावली बैठक.

पणजी: रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (RGP) मधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली असून पक्षात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे प्रमुख मनोज परब यांच्या अध्यक्षतेखाली पणजी येथील पक्ष कार्यालयात केंद्रीय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला विश्वेश नाईक, अजय खोलकर आणी इतर नेते उपस्थित होते; मात्र पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांच्यासह त्यांच्या गटातील ४ प्रमुख नेते या बैठकीला अनुपस्थित राहिले.
दरम्यान आज सायंकाळी पुन्हा चार वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यात सुरू असलेल्या तीव्र मतभेदांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरेल. सध्या दोन्ही गट सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर सडकून टीका करत आहेत.आजही मनोज परब गटातील आशीष परब यांनी 'केंद्रीय समितीच्या बैठकीसाठी व्यस्त असल्याचा बहाणा, पण पब्लिसिटीसाठी मात्र कधीच नाही म्हणणार नाही असे म्हणत पोस्ट केली. पार्टीच्या भवितव्यासाठी बोलावलेल्या बैठकीला दांडी, बाहेरच्या बैठकांना मात्र उपस्थित म्हणत पुन्हा विरेश यांच्यावर पुन्हा टीका केली.

दरम्यान आमदार वीरेश बोरकर गटाच्या सदस्यांनी कालच पणजीत पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले होते, ज्यावर आजच्या बैठकीत मुख्यत्वे चर्चा झाली. निवडून आल्यानंतर वीरेश बोरकर यांनी अध्यक्षपद सोडून ते मनोज परब यांच्याकडे सोपवले होते. त्यानंतर परब यांनी संपूर्ण कार्यकारिणी समितीत मोठे बदल केले. पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) न घेतल्यामुळे सध्याची कार्यकारिणी समितीच सर्वोच्च बनली असून, याच समितीने थेट पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक दावा प्रशांत पागी यांनी काल केला होता. गेल्या दोन कार्यकारिणी बैठकांमध्ये केवळ सदस्यांना बाहेर काढण्याचे काम झाले, असा आरोपही त्यांनी केला.

या अंतर्गत वादाला सांत आंद्रे मतदारसंघातूनही फोडणी मिळाली आहे. मागील बैठकीत ज्युलियस आल्मेदा यांना पक्षातून काढण्याचा निर्णय झाल्याने सांत आंद्रे ब्लॉक कमालीचा नाराज आहे. याबाबत मयूर आर्सेकर यांनी आल्मेदा यांच्याशी संवाद साधण्याचा सल्ला मनोज परब यांना दिला होता, मात्र परब यांनी ज्युलियस यांना पक्षाबाहेर काढले, असा आरोप प्रेमानंद गावडे यांनी केला. पक्षासंदर्भातील इतके मोठे निर्णय घेण्याचा अधिकार केवळ कार्यकारिणीला नाही. गेल्या तीन वर्षांत पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नसल्याने, ती तातडीने घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांचे मत जाणून घ्यावे, अशी मागणी कॅन्डिदो कोरेय्या यांनी काल केली. या अंतर्गत संघर्षामुळे 'आरजीपी'समोरील राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.