सीसीटीव्हीत चेहरा अस्पष्ट असूनही केवळ लाल रंगाच्या शूजवरुन पुणे पोलिसांनी लागला माग.

पुणे : एका बहाद्दराने मंदिरात येऊन देवीला साकडे घालत चक्क देवीचेच मंगळसूत्र लांबवले. या भामट्याचा डाव आळेफाटा पोलिसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात घडलेल्या या विचित्र चोरीच्या प्रकरणाने सोशल मीडियावर सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. मंदिरात चोरी करताना आरोपीचा चेहरा मास्कमुळे स्पष्ट दिसत नव्हता, मात्र त्याने घातलेल्या गडद 'लाल रंगाचे शूज'मुळेच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले. पोलिसांनी या लाल शूजचा माग काढत आंतरजिल्हा चोरट्यांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी बेल्हे येथील मुक्ताई मंदिरात चोरीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एक चक्रावून टाकणारे दृश्य दिसले. एक चोरटा मंदिरात प्रवेश करतो, गाभाऱ्यात जाऊन अत्यंत श्रद्धापूर्वक देवीच्या पाया पडतो आणि संधी मिळताच देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पसार होतो. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आणि त्या ठळक दिसणाऱ्या लाल शूजचा आधार घेत तुकाराम पोपट कातोरे (वय २४) या संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या चोरीमागचे एक धक्कादायक आणि व्यावसायिक कनेक्शन समोर आले.

तुकाराम हा मंदिरामधून महागडे अॅम्प्लीफायर, मिक्सर आणि दागिने चोरायचा. त्यानंतर हे चोरीचे साहित्य तो आपले मेव्हणे निवृत्ती मेंगाळ आणि अजय मेंगाळ यांच्याकडे सुपूर्द करायचा. हे दोघेही व्यावसायिक डीजे ऑपरेटर असून, या चोरीच्या साहित्याचा वापर करून ते लग्नसमारंभांमध्ये डीजे वाजवण्याच्या मोठ्या सुपाऱ्या घेत असत. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीचे आठ अॅम्प्लीफायर, दोन मिक्सर, एलईडी टीव्ही आणि चोरीला गेलेले देवीचे मंगळसूत्र जप्त केले आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.