डब्ल्यूएचओकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित

आफ्रिका : डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा या आफ्रिकन देशांमध्ये 'इबोला' व्हायरसच्या नव्या व्हेरियंटचा उद्रेक वेगाने पसरत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने या संकटाला 'आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केले आहे. या नव्या प्रादुर्भावामध्ये आतापर्यंत ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो जणांना याची लागण झाल्याचा संशय आहे. मात्र, हा प्रादुर्भाव अजून जागतिक महामारीच्या पातळीवर पोहोचलेला नाही, असेही डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.
आरोग्य यंत्रणांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे हा उद्रेक इबोलाच्या 'बुंदिबुग्यो' (Bundibugyo) या अत्यंत घातक व्हेरियंटमुळे झाला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या इबोलाच्या लसी केवळ 'झैरे' (Zaire) या जुन्या व्हेरियंटवर प्रभावी आहेत. बुंदिबुग्यो व्हेरियंटवर अद्याप कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नसल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या परिस्थितीला 'असाधारण' म्हटले आहे. काँगोच्या आरोग्य मंत्र्यांच्या मते, या व्हेरियंटचा मृत्यूदर ५० टक्क्यांपर्यंत असू शकतो.
डब्ल्यूएचओ आणि आफ्रिका सिडीएसच्या अहवालानुसार, काँगोमध्ये आतापर्यंत ८८ लोकांचा मृत्यू झाला असून ३३० हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. इबोला हा संसर्गजन्य आजार असून तो संक्रमित व्यक्तीच्या रक्त, लाळ किंवा उलट्या यांसारख्या शरीरातील द्रवांच्या थेट संपर्कात आल्याने पसरतो. हा हवेतून पसरणारा आजार नाही.
काँगोच्या सीमांना लागून असलेल्या देशांना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओने सर्व शेजारील देशांना सीमांवर स्क्रिनिंग वाढवण्याचे, संशयित रुग्णांना त्वरित विलग करण्याचे आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सीमा पूर्णपणे बंद न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण सीमा बंद केल्यास नागरिक छुप्या मार्गांचा वापर करू शकतात, ज्यांचा मागोवा घेणे अधिक कठीण होईल. 'डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स' या वैद्यकीय संस्थेनेही या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू केले आहे. सध्याच्या परिस्थितीवर संपूर्ण जगाचे लक्ष असून आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.