जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर लीक; सीबीआयचा दावा. वनस्पतिशास्त्राची शिक्षिका मनिषा मंधारे यांना शनिवारी अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'नीट-युजी २०२६' (NEET-UG 2026) प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एक मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) अंतर्गत समितीमधील दुसऱ्या एका तज्ज्ञ सदस्याला अटक करण्यात आल्यानंतर आता संपूर्ण पेपर सेट करणारी समिती आणि एनटीएचे वरिष्ठ अधिकारी सीबीआयच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणात येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

सीबीआयने शनिवारी पुणे येथील वनस्पतिशास्त्राच्या (Botany) शिक्षिका मनिषा गुरुनाथ मंधारे यांना अटक केली. मनिषा मंधारे यांची एनटीएने तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती आणि त्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीत सामील होत्या. त्यामुळे त्यांना वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र (Zoology) या विभागांच्या अत्यंत गोपनीय प्रश्नपत्रिका सेट करण्याच्या कामांत थेट प्रवेश होता. या अटकेच्या अवघ्या एक दिवस आधी सीबीआयने रसायनशास्त्राचे (Chemistry) निवृत्त व्याख्याते पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली होती. त्यांना या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार (Kingpin) मानले जात आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर लीक प्रकरणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच थेट 'एनटीए'च्या आतून मूळ स्त्रोत शोधण्यात यश आले आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर त्याचे पीडीएफ वेगवेगळ्या मेसेजिंग ॲप्सवर पसरल्याने शेकडो विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला असण्याची शक्यता आहे. मनिषा मंधारे यांनी एप्रिल महिन्यात आपल्या पुणे येथील निवासस्थानी निवडक विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग क्लासेस घेतले होते. या वर्गांमध्ये त्यांनी आगामी परीक्षेतील वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे प्रश्न डिक्टेट केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या वह्यांमध्ये व पुस्तकांमध्ये ते नोंदवून घेण्यास सांगितले. यातील बहुतांश प्रश्न ३ मे रोजी झालेल्या मुख्य परीक्षेशी तंतोतंत जुळणारे होते. या विद्यार्थ्यांची जुळवाजुळव पुणे येथीलच ब्युटी पार्लर चालक आणि सहआरोपी मनिषा वाघमारे हिच्या माध्यमातून करण्यात आली होती.

या तपासात एनटीएच्या अंतर्गत व्यवस्थेतून प्रश्नपत्रिकेचे दोन संच (एक हस्तलिखित आणि एक टाईप केलेला) लीक झाल्याचे समोर आले आहे. कुलकर्णी यांनी रसायनशास्त्राचा तर मंधारे यांनी जीवशास्त्राचा पेपर लीक केला होता. शनिवारी सीबीआयने कलकर्णी आणि वाघमारे यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू येथील विशेष न्यायालयात हजर करून १४ दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी ३ मे रोजी परीक्षा संपल्यानंतर मूळ प्रश्नपत्रिका जाळून टाकल्याचेही समोर आले आहे. सीबीआयने गेल्या २४ तासांत ६ ठिकाणी छापे टाकून लॅपटॉप, बँक कागदपत्रे आणि मोबाईल जप्त केले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानसह ५ राज्यांतून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. दरवर्षी २२ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात; गैरव्यवहारामुळे ३ मे ची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल.
