मध्य प्रदेशात राजधानी एक्सप्रेसला आग; ६८ प्रवासी सुरक्षित

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
just now
मध्य प्रदेशात राजधानी एक्सप्रेसला आग; ६८ प्रवासी सुरक्षित

मध्य प्रदेश : थिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या (१२४३१) 'बी-१' या वातानुकूलित (AC) कोचला रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या कोटा रेल्वे विभागातील लुनी रिच्छा आणि विक्रमगढ आलोट स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने, रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ (RPF) जवानांच्या तत्परतेमुळे अवघ्या १५ मिनिटांत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन रतलामपासून सुमारे ११० किमी अंतरावर असताना अचानक 'बी-१' कोचमधून धूर आणि आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. काही सेकंदांतच आगीने रौद्ररूप धारण केले. ट्रेनच्या गार्डने तत्काळ लोको पाईलटला याची माहिती दिली आणि गाडी थांबवण्यात आली. डब्यात एकूण ६८ प्रवासी प्रवास करत होते. आग लागताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) पुरवठा खंडित केला आणि आग लागलेला डबा मुख्य ट्रेनपासून वेगळा केला.

या अपघातामुळे दिल्ली-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा फटका अनेक गाड्यांना बसला. यामध्ये मुंबई सेंट्रल-जयपूर एक्सप्रेस (१२९५५), स्वराज एक्सप्रेस (१२४७२), तर पुणे स्पेशल (०१४९२) स्थानकावर थांबवून ठेवावी लागली. कोटा विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, रूळ मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून रेल्वे प्रशासनातर्फे या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

हेही वाचा