बिगर गोमंतकियांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामांवरून स्थानिक आक्रमक

कोरगाव : कोरगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सरपंच देविदास नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा पार पडली. या सभेत पेडणे ते कोरगाव मुख्य रस्त्याचे अनेक वर्षांनंतर डांबरीकरण करून दिल्याबद्दल स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. मात्र, दुसरीकडे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या मेगा प्रकल्पांना तीव्र विरोध करत ग्रामस्थांनी अशा प्रकल्पांना कोरगावात थारा न देण्याचा ठराव मांडला. याशिवाय बिगर गोमंतकियांनी केलेली बेकायदेशीर बांधकामे आणि कचऱ्याची वाढती समस्या यांवर ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली.
व्यासपीठावर उपसरपंच, पंचायत सदस्य समिल भाटलेकर, अब्दुल करिम यासीन नाईक, दिवाकर जाधव, नीता नर्से, कल्पिता कलशावकर, अनुराधा कोरगावकर, उमेश च्यारी, पंचायत सचिव अविनाश पाळणी आणि निरीक्षक म्हणून देवानंद गावडे उपस्थित होते. पेडणे ते कोरगाव रस्ता खराब असल्याने अनेक अपघात होत होते, आमदारांनी हा प्रश्न सोडवल्याने देवानंद गावडे, सुदीप कोरगावकर यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान, पंचायत सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना इमारतीतील जुन्या वस्तू संबंधित पंचांनी विकल्याचा गंभीर आरोप पुरावे दाखवत नरेश कोरगावकर यांनी केला. यावर सरपंचांनी चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
डोंगरांवर होणाऱ्या बेकायदेशीर बांधकांमांमुळे जंगले आणि नैसर्गिक झरे नष्ट होत असूनही जैवविविधता समिती दुर्लक्ष करत असल्याचा प्रश्न राहुल भगत यांनी उपस्थित केला. मागील ग्रामसभेतील बांधकाम पाडण्याच्या ठरावावर पंचायतीने काय पाठपुरावा केला, अशी विचारणा त्यांनी केली. पाणीटंचाईवर बोलताना सरपंचांनी आमदारांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रस्त्याशेजारील झाडे छाटण्याची मागणी केली. तसेच भालखाजन येथे लोकांना मिळणारे खारट पाणी आणि रस्त्याशेजारी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने कारवाई करण्याची मागणी सुदीप कोरगावकर यांनी केली. या सभेत पंढरीनाथ आरोलकर, रोहिदास भाठलेकर, विकास गावडे आदींनी सहभाग घेतला. शेवटी सरपंच नागवेकर यांनी आभार मानले.