फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवी

निसर्गाच्या सान्निध्यात देवी फातर्पेकरीण फातर्पा गावात टुमदार मंदिरात बसून भक्तांना दर्शन देते. ही देवी ‘मागणेची देवी’ म्हणून गोव्यासह कर्नाटक व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

Story: जत्रा |
16th May, 06:15 pm
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा  फातर्पेकरीण देवी

देवभूमी फातर्पाच्या पावन भूमीत सुंदर मंदिरात विराजमान होऊन भकांना पावणारी व भक्तांच्या मागणीला ओ देणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री शांतादुर्गा फातर्पेकरीणच्या चार दिवसीय जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी होते.

देवी फातर्पेकरीण पहिल्या दिवशी चांदीच्या रथात विराजमान होते. दुसऱ्या दिवशी देवी मसूर रथावर आरूढ होते. तिसऱ्या दिवशी देवी फातर्पेकरीण सूर्य रथावर स्वार होते, तर चौथ्या दिवशी देवीचे हजारो भक्त देवीला महारथात बसवून हरहर महादेवाचा गजर करत देवीच्या मिरवणुकीत सहभागी होतात.

निसर्गाच्या सान्निध्यात देवी फातर्पेकरीण फातर्पा गावात टुमदार मंदिरात बसून भक्तांना दर्शन देते. श्री शांतादुर्गा भूमीपुरुष सप्तकोटेश्वर संस्थान हे या भागातील एक प्रसिद्ध संस्थान आहे. सप्तकोटेशवर मंदिराच्या आवारात श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिर, सप्तकोटेश्वर मंदिर व इतर परिवारातील लहान मोठ्या मंदिरांची मांदियाळी बघायला मिळते.

या मंदिर परिसरात संध्याकाळी कातरवेळी आलेल्या भक्तांना एक वेगळीच अनुभूती मिळते. भक्त प्रसन्नतेने देवीचे दर्शन घेऊन आपली इच्छा व्यक्त करतात. मंदिरातून येणारा अगरबत्तीचा सुगंध भक्तांच्या मनात ईश्वर भक्तीचे संचित जमा करतो. 

सातेरी, भूमीपुरुष, सप्तकोटेश्वर, नारायण देव है संलग्न देव. अशाच प्रकारची देव देवता उत्तरेतील तुये पेडणे येथे पहायला मिळते. तुये व फातर्पा या भागातील मराठ्यांत भावकी मानली जाते. म्हणून त्यांच्यात रोटी-बेटीचा संबंध होत नाही. बाटाबाटीच्या काळात पोर्तुगीजांनी अनेक मंदिरे उद्‌ध्वस्त केली. धर्म रक्षण व देव देवतांचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक हिंदूंनी आपले देव सुरक्षित ठिकाणी हलविले. अशा संकटकाळी फातर्पा येथे सासष्टीतील अनेक देवी देवतांना स्थळ बहाल करण्यात आले. 

श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण हे एक आगृत देवस्थान म्हणून मान्यता पावले आहे. याच मंदिराला लागून भव्य असे पाषाणी मंदिर उभारले असून आधुनिकता व पुरातन कलाकृतीचा संगम साधून उभारलेले पाषाणी मंदिर अभूतपूर्व असे आहे. देवी शांतादुर्गा ही भक्तांच्या हाकेला पावणारी देवी म्हणून मान्यता प्राप्त आहे. ही देवी ‘मागणेची देवी’ म्हणून गोव्यासह कर्नाटक व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

हेही वाचा