
मडगाव : डॉक्टर केतन भाटीकर यांच्या मृत्यूप्रकरणी अनेकजण संशय व्यक्त करत आहेत. ही घटना कर्नाटकातील अनमोड घाटात घडली असल्याने याबाबतचा गुन्हा कर्नाटकात नोंद होऊन कर्नाटक पोलिसांनी प्रकरण हाताळण्याची गरज आहे. गोवा पोलिसांवर हे प्रकरण हाताळताना दबाव असू शकतो. या प्रकरणात सखोल तपासाची मागणी ॲड. राधाराव ग्रासियस यांनी केली.
ॲड. राधाराव यांनी व्हिडिओ जारी करत डॉक्टर केतन भाटीकर यांच्या मृत्यू प्रकरणी ज्या काही शंका उपस्थित करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने सखोल चौकशीची मागणी केली आहे. ॲड. राधाराव म्हणाले की, केतन भाटकर हे फोंडा पोटनिवडणुकीतील उमेदवार होते. ही निवडणूक रद्द करण्यात आल्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच डॉ. केतन यांचा मृत्यू होणे याबाबत समाज माध्यमांमधून विविध शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणात गोवा पोलीस केतन भाटीकर यांना न्याय देऊ शकत नाहीत. डॉ. भाटीकर यांचा मृत्यू सर्पदंशाने झाला की, अन्य कोणत्या कारणाने झाला असल्यास त्याबाबतची योग्य माहिती समोर येणे गरजेचे आहे. डॉ. भाटीकर यांच्यासोबत जी घटना घडली ती कर्नाटक राज्याच्या हद्दीतील अनमोड घाटात घडलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण खानापूर किंवा ज्या भागात घटना घडली त्या कर्नाटकातील भागातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होणे गरजेचे आहे. गोवा पोलीस हे प्रकरण कसे हाताळतात ते आपणास कळालेले नाही. या प्रकरणात योग्यरीत्या तपास होऊ नये यासाठी गोवा पोलिसांवर दबाव असू शकतो. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. भाटकर यांच्या मृत्यूप्रकरणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या भागातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद व्हावा. कर्नाटक पोलिसांनी याबाबतचा तपास करावा, अशी मागणी ॲड. राधाराव यांनी केली. तसेच काँग्रेसनेही याची दखल घेत या संदर्भात आवश्यक ती पावले उचलावीत, असेही ॲड. राधाराव यांनी सांगितले.