साळगाव पोलिसांकडून संशयित युवकाला अटक

पणजी : बार्देश तालुक्यातील साळगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १ मे २०२६ पूर्वी साळगाव येथील एका भागात घडली. या संदर्भात १६ मे २०२६ रोजी रात्री ९.१० वाजता साळगाव पोलीस स्थानकात पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २२ वर्षीय संशयिताने पीडित अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ६४(१), ६५(१) सह गोवा बाल हक्क कायद्याचे कलम ८(२) आणि पोक्सोच्या कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला रीतसर अटक करण्यात आली.
साळगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्त्वाखाली महिला उपनिरीक्षक सनिषा नाईक या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.