आरजी विसर्जित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : मनोज परब

आमदार वीरेश बोरकर यांना आरजी पक्षाने बजावली कारणे दाखवा नोटीस

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 mins ago
आरजी विसर्जित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : मनोज परब

पणजी : कायदेशीर मार्गाने किंवा विविध कारस्थाने करून आरजी पक्षात फूट पाडून पक्ष ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार वीरेश बोरकर यांच्या 'भाड्याच्या बैलांच्या' तसेच आदित्य देसाई यांच्यासारख्या भ्याड माणसांच्या ताब्यात मी कदापि पक्ष देणार नाही. कष्ट आणि घाम गाळून उभ्या राहिलेल्या पक्षाचे अस्तित्व कायम राहणार असून पक्ष बरखास्त करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.



आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी सायंकाळी पणजीतील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी खजिनदार अजय खोलकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी कार्यकारिणीच्या गाभा (कोअर) समितीची बैठक झाल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातील अंतर्गत मतभेद काही दिवसांपासून चव्हाट्यावर येत आहेत. आरजीत फूट पडणार किंवा पक्ष बरखास्त होणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू होती. आरजीतील एका गटाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर, मनोज परब यांनी कोअर कमिटीची बैठक घेऊन ही पत्रकार परिषद घेतली.




ज्युलियस आल्मेदा यांना पक्षविरोधी कारवाईसाठी पक्षाने कारणे दाखवा नोटीस जारी केली होती, तरीही आमदार वीरेश बोरकर यांनी त्यांच्याशी जवळीक ठेवली. तीनदा नोटीस जारी करूनही वीरेश बोरकर पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. याच कारणासाठी पक्षाने रितसर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती पक्षाचे खजिनदार अजय खोलकर यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला दिली.




मनोज परब यांनी पुढे आरोप केला की, वीरेश बोरकर यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांसोबत संबंध कायम ठेवतानाच, मडगावात पक्ष ताब्यात घेण्याबाबत गुप्त बैठक घेतली. तसेच आदित्य देसाई यांच्यासारख्यांकडून कायदेशीर सल्ले घेणे सुरूच ठेवले आहे. आदित्य देसाई हे दुसऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज चालवत आहेत, असा आरोपही मनोज यांनी केला. 




परब पुढे म्हणाले, पक्ष ताब्यात घ्यायचा असेल, तर पक्ष कार्यालयात येऊन रितसर पद्धतीने तो ताब्यात घ्यावा, असे आवाहन मी स्वतः आमदार वीरेश बोरकर यांना केले होते. तरीही याला प्रतिसाद न देता त्यांनी आदित्य देसाई आणि ज्युलियस आल्मेदा यांना सोबत घेऊन पक्ष ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. अशा लोकांच्या ताब्यात मी कदापि पक्ष देणार नाही. मी व विरेश बोरकर यांच्यामधे फूट निर्माण करण्याचे प्रयत्न काहींनी चालविले आहेत. याबाबत विरेशसमोर मी बऱ्याचदा रडलो देखील आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर निश्चिपणे कारवाई होईल.



शेवटी इशारा देताना ते म्हणाले, बेशिस्त वर्तन किंवा पक्षात फूट पाडण्याचे कारस्थान करणाऱ्यांवर निश्चितपणे कठोर कारवाई होईल. माझा स्वभाव डिप्लोमॅटिक किंवा बरेपण दाखवणारा नाही. पक्षविरोधी कारवाया करूनही आतापर्यंत फक्त ६ ते ७ जणांविरुद्ध कारवाई झालेली आहे. हा पक्ष बरखास्त करण्याचा नव्हे, तर पक्ष ताब्यात घेण्याचा डाव आहे.

हेही वाचा