विविध कार्यक्रमांचे आयोजन : देवस्थानाला भेट देण्याचे कुर्डीकरांचे आवाहन

सांगे : केवळ समुद्रकिनारे आणि पर्यटनासाठीच नव्हे, तर समृद्ध ऐतिहासिक वारशासाठी ओळखल्या जाणारे गोव्यातील सांगे तालुक्यातील ऐतिहासिक कुर्डी गाव सध्या सर्वांसाठी खुले झाले आहे. वर्षभर साळावली धरणाच्या पाण्यात बुडालेल्या या गावातील प्राचीन व जागृत श्री सोमेश्वर देवस्थानचा वार्षिक वर्धापनदिन येत्या रविवारी, २४ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त दुपारी २ वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
साळावली धरणाचा इतिहास
१९७० च्या दशकात जेव्हा सांगे तालुक्यात साळावली धरणाची उभारणी करण्यात आली, तेव्हा कुर्डी आणि कुर्पे ही गावे धरणाच्या पाण्याच्या विळख्यात आली आणि पूर्णपणे बुडाली. येथील रहिवाशांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात आले. वर्षातील अकरा महिने हे संपूर्ण गाव पाण्याखालीच असते. मात्र, मे महिन्याच्या सुमारास उन्हाळ्यामुळे धरणाची पाण्याची पातळी खालावते आणि हा संपूर्ण ऐतिहासिक गाव पुन्हा एकदा जमिनीवर अवतरतो. वर्षभर बुडालेला हा गाव फक्त मे महिन्यातच पाहता येतो.
‘जागृत देवस्थान’ श्री सोमेश्वर मंदिर आजही सुरक्षित
संपूर्ण गाव पाण्यात बुडला असला, तरी भगवान शिवाला समर्पित असलेले ऐतिहासिक श्री सोमेश्वर मंदिर ही एकमेव अशी वास्तू आहे, जी ५० वर्षांनंतरही पाण्यात तशीच सुरक्षित आणि शाबूत आहे. हे मंदिर ‘जागृत देवस्थान’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरातील पाषाणाचा नंदी आणि इतर काही मूर्ती सुरक्षेच्या कारणास्तव वाळकिणी (कॉलनी नं. २) येथे हलवण्यात आल्या आहेत. तसेच या मंदिर परिसराजवळ प्राचीन काळातील डोलमेन (Dolmen), मेनहिर्स (Menhirs) आणि इतर पुरातन दगडी रचना पाहायला मिळतात, ज्या या भागाच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात.
कुर्डीकरांचे भावनिक आवाहन; पर्यटकांसाठी सुवर्णसंधी
आजच्या घडीला कुर्डी गाव आणि सोमेश्वर मंदिर हे गोव्यातील एक उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळ बनले आहे. मात्र, ते मुख्य लोकवस्तीपासून बरेच दूर आणि एकांतात असल्याने अजूनही अनेक लोकांना याबद्दल पुरेशी माहिती नाही. दरवर्षी मे महिन्यात जेव्हा हा गाव पाण्याचा वेढा तोडून बाहेर येतो, तेव्हा मूळ कुर्डीवासीय आपल्या पूर्वजांच्या भूमीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि या मातीवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सोमेश्वर मंदिरात एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात. हा उत्सव म्हणजे इतिहास डोळ्यांनी अनुभवण्याची एक मोठी संधी आहे. त्यामुळे या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सांगे परिसरासह संपूर्ण गोमंतकीयांनी आणि पर्यटकांनी कुर्डीला आवर्जून भेट द्यावी, असे भावनिक आवाहन कुर्डीवासियांनी केले आहे.