वाहतूक सांताक्रूझ नेक्सा शोरूममार्गे वळवली

पणजी: बांबोळी येथे नियाज रेस्टॉरंटजवळ काल रात्री कंटेनर उलटला. या अपघातामुळे बांबोळीकडून पणजीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कामगारवर्गाला आणी इतर प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागला. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेची गंभीर दखल घेत वाहतूक पोलीस अधीक्षकांनी प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. बांबोळीकडून पणजीकडे जाणाऱ्या वाहनांना सांताक्रूझ येथील नेक्सा शोरूममार्गे वळवण्यात आले आहे. तसेच, दक्षिण गोव्यातून पणजी किंवा उत्तर गोव्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना बोरी-फोंडा मार्गाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, अपघातग्रस्त कंटेनर हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
गोव्यात काल पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी रस्त्यावरून जाताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.