'आमच्या दुःखाचे राजकारण करू नका'; डॉ. केतन भाटीकर यांच्या कुटुंबीयांची विनंती

सोशल मीडियावरील अफवांवर केले भाष्य; म्हणाले-सुशांत आमच्यासाठी खूप काही!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23 mins ago
'आमच्या दुःखाचे राजकारण करू नका'; डॉ. केतन भाटीकर यांच्या कुटुंबीयांची विनंती

पणजी : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेस नेते दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध चर्चा, तर्कवितर्क आणि अफवांमुळे भाटीकर कुटुंब अत्यंत अस्वस्थ झाले आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. केतन यांच्या कुटुंबीयांनी एक व्हिडिओ जारी करून, आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा वेळी कोणीही या प्रकरणाचे राजकारण करू नये, अशी कळकळीची विनंती गोमंतकीयांना केली आहे. 




डॉ. केतन भाटीकर यांचे १५ मे रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यातून सर्वच स्तरांतून मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर त्यांच्या मृत्यूच्या कारणांवरून अनेक तर्कवितर्क, उलटसुलट चर्चा आणि अफवांना ऊत आला आहे. नागरिकांच्या या तीव्र प्रतिक्रियांमुळे आणि सोशल मीडियावरील 'स्पेकुलेशन्स'मुळे (तर्कवितर्कांमुळे) संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, असे डॉ. केतन यांचे भाऊ डॉ. कौतुक भाटीकर यांनी सांगितले.


Congress leader Dr Ketan Bhatikar dies after suspected snake bite -  digitalgoa


या कठीण प्रसंगात संपूर्ण भाटीकर कुटुंबाने एकत्र येत जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. डॉ. केतन यांचे वडील कीर्तीकुमार भाटीकर, आई कादंबरी भाटीकर, भाऊ डॉ. कौतुक आणि वहिनी सोनम भाटीकर यांनी गोमंतकीय जनतेचे आभार मानत म्हटले आहे की, डॉ. केतन यांच्या निधनानंतर ज्यांनी ज्यांनी आम्हाला फोन करून किंवा प्रत्यक्ष येऊन सांत्वन केले, त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. परंतु, आता आम्हाला कोणत्याही प्रकारच्या राजकारणात ओढू नका. आम्हाला फक्त शांतता हवी आहे. केतन यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंब आधीच मोठ्या धक्क्यात आहे. अशा वेळी सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादविवादांमुळे आणि चुकीच्या चर्चांमुळे संभ्रम अधिक वाढत आहे. जर लोकांना खरोखरच डॉ. केतन यांच्याबद्दल सहानुभूती, आदर किंवा प्रेम असेल, तर त्यांनी त्यांच्या निधनावरून राजकारण करण्याऐवजी डॉ. केतन यांनी सुरू ठेवलेले समाजकार्य आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत, हाच त्यांच्यासाठी खरा सहभाग ठरेल, अशी भावना कुटुंबाने व्यक्त केली आहे.



शेवटी, या प्रकरणाला पूर्णविराम देताना कुटुंबीयांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, डॉ. केतन भाटीकर यांच्या मृत्यूनंतर आमच्यासाठी राजकारण संपले आहे. या मृत्यूबाबत कोणालाही मनात कोणताही संशय ठेवण्याची गरज नाही. केतनचा मित्र सुशांत हा आमच्यासाठी खूप काही आहे आणि आम्हाला याप्रकरणी कोणत्याही प्रकारची चौकशी नको आहे, असे सांगत कुटुंबाने केवळ शांततेची मागणी केली आहे.



हेही वाचा