१०० कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी गोव्यासह दिल्लीतील अनेक ठिकाणी कारवाई.

पणजी : आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चंदिगड विभागाने १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कथित बँक फसवणूक आणि वित्तीय गैरव्यवहार प्रकरणात 'आप'चे रणनीतीकार आणी गोवा प्रभारी दीपक सिंगला यांच्याविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळी ईडीच्या पथकांनी गोव्यातील दोनापावला आणि दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली. यासोबतच दिल्लीतील 'आप'चे दुसरे नेते आणि व्यावसायिक राम सिंह यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानावरही १८० कोटी रुपयांच्या हेराफेरीच्या आरोपाखाली तपास यंत्रणेकडून शोधमोहीम राबवली जात आहे. यामुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ईडीच्या चंदिगढ झोनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून तपास यंत्रणा बँकांचे आर्थिक व्यवहार, संशयास्पद कंपन्या आणि वित्तीय कागदपत्रांची पडताळणी करत होती. त्यानंतर पूर्व दिल्लीच्या स्वास्थ विहार येथील दीपक सिंगला यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आतमध्ये अधिकाऱ्यांकडून डिजिटल उपकरणे, बँक खाती आणि मालमत्तांशी संबंधित कागदपत्रांची कसून चौकशी केली जात आहे. दीपक सिंगला हे 'आप'चे वरिष्ठ नेते असून त्यांनी २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती, तसेच ते गोव्याचे पक्ष प्रभारी म्हणूनही कार्यरत आहेत. यापूर्वी २०२४ मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतरही त्यांच्या घरावर छापेमारी झाली होती.
दुसरीकडे, दिल्लीतील बदरपूर भागातील दिग्गज नेते आणि 'बाबाजी फायनान्स ग्रुप'चे मालक राम सिंह यांच्यावर जनता आणि बँकांची फसवणूक करून १८० कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप आहे. राम सिंह हे दिल्ली विधानसभेचे माजी आमदार राहिले असून, निवडणुकीदरम्यान सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश असायचा. ईडी सध्या या दोन्ही नेत्यांच्या व्यावसायिक भागीदारी आणि कथित फसवणुकीच्या रकमेचा नेमका वापर कुठे व कसा केला गेला, याचा शोध घेत आहे. या संपूर्ण प्रकरणावर ईडीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलेले नाही, तसेच आम आदमी पक्षानेही या कारवाईवर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे गोव्यापासून दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
दरम्यान आपच्या नेत्या आतिशी सिंह यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. गोव्यात 'आप'ची वाढती लोकप्रियता पाहून भाजपने पक्षाचे सहप्रभारी दीपक सिंगला यांच्यावर ईडीची धाड टाकली असून, हा कार्यकर्त्यांना डराविण्याचा आणि पक्षाचा डेटा बळकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आतिशी यांनी केला.