विवाहाच्या वादातून जन्मदात्या पित्याकडून मुलीची हत्या; विहिरीत फेकून केली दगडफेक

कर्नाटकातील घटनेने खळबळ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
43 mins ago
विवाहाच्या वादातून जन्मदात्या पित्याकडून मुलीची हत्या; विहिरीत फेकून केली दगडफेक

तुमकुरु : कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील (Tumkuru District of Karnataka)  शिरा तालुक्यात (Shira Taluka) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाह करण्याच्या वादातून जन्मदात्या पित्यानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची निघृण हत्या (Murder of Daughter)  केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर एकूण हा प्रकार उघडकीस आला.  या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मेघना असे मृत मुलीचे नाव असून; ती निंबेमरदहळ्ळी गावात आई-वडिलांसोबत राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, मेघनाच्या विवाहाच्या मुद्द्यावरून घरात वारंवार वाद होत होते. तिची आई निर्मला आणि नातेवाईकांनी मेघना १८ वर्षांची झाल्यानंतर नातेवाईकाच्या मुलासोबत तिचा विवाह करण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी साड्या आणि सोन्याचे दागिनेही खरेदी करण्यात आल्याचे सांगितले जाते.

वडिलांचा विवाहाला विरोध; घरात वाद

मात्र, मेघनाचे वडील थिम्मरायप्पा यांचा या विवाहाला विरोध होता. गेल्या चार-पाच महिन्यांपासून याच कारणावरून घरात सतत वाद सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

१६ एप्रिल रोजी एका वादानंतर दुसऱ्याच दिवशी मेघना अचानक बेपत्ता झाली. मजुरीचे काम करून संध्याकाळी घरी परतलेल्या आईला मुलगी घरात आढळली नाही. तिने मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद होता. संशय आल्याने निर्मला यांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

मृतदेह विह‌िरीतून काढून निर्जन ठिकाणी पुरला

दरम्यान, मेघनाचे वडीलही अचानक गायब झाल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. चौकशीदरम्यान थिम्मरायप्पा याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, थिम्मरायप्पा याने प्रथम मेघनाला विहिरीत ढकलले आणि तिच्यावर दगडफेक केली. त्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून निर्जन ठिकाणी पुरल्याचा संशय आहे.

पत्नीसोबत पतीही तक्रार देण्यास पोलीस स्थानकात

विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर संशय टाळण्यासाठी थिम्मरायप्पा स्वतः पत्नीसमवेत पोलीस ठाण्यात गेला आणि बेपत्ता तक्रार दाखल करण्यासाठी मदत केल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून; कर्नाटका पोलीस (karnataka Police)  अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा