सराव परीक्षांमधील प्रश्न थेट 'नीट' मुख्य परीक्षेत

लातूर : देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'नीट २०२६' परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. लातूर येथील प्रसिद्ध 'आरसीसी' कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अखेर ताब्यात घेतले आहे. आरसीसीच्या सराव परीक्षांमधील प्रश्न थेट 'नीट'च्या मुख्य प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळल्याचे समोर आल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.
सूत्रानुसार, सीबीआयच्या विशेष पथकाने शुक्रवारी प्रा. मोटेगावकर यांची सलग ११ तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना रविवारी पुण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. रविवारी पुण्यात दिवसभर चाललेल्या मॅरेथॉन चौकशीनंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी लातूर येथील आरसीसीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकून संगणक, लॅपटॉप, आयपॅड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
या प्रकरणाला कलाटणी तेव्हा मिळाली, जेव्हा आरसीसीच्या सराव परीक्षेचे प्रश्न आणि नीटची मूळ प्रश्नपत्रिका यात कमालीचे साम्य आढळले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये संस्थेचे प्रमुख विद्यार्थ्यांना, "आपल्या टेस्ट सिरीजमधील किती प्रश्न मुख्य परीक्षेत आले?" असे विचारत आहेत आणि विद्यार्थी त्याला मोठ्या उत्साहाने होकार देत आहेत. या व्हिडिओमुळे आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे सीबीआयचा संशय अधिक बळावला.
१९९९ मध्ये अवघ्या १० विद्यार्थ्यांपासुन सुरू झालेल्या 'आरसीसी'चे आज संपूर्ण महाराष्ट्रात जाळे पसरले आहे. येथे दरवर्षी सुमारे ४० हजार विद्यार्थी नीट आणि जेईईची तयारी करतात. प्रति विद्यार्थी ५० ते ६५ हजार रुपये फी घेणाऱ्या या संस्थेची वार्षिक उलाढाल १०० कोटींपेक्षा जास्त आहे. लातूरसारख्या 'एज्युकेशन हब'मधील एवढ्या मोठ्या संस्थाचालकाला ताब्यात घेतल्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.