लखनौ विद्यापीठात विद्यार्थिनीला आमिष दाखवून नीट युजी २०२६ पेपर लीक

प्राध्यापकाला अटक; ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
50 mins ago
लखनौ विद्यापीठात विद्यार्थिनीला आमिष दाखवून नीट युजी २०२६ पेपर लीक

लखनौ : "डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर आणले आहेत. तू मला कधी भेटायला येशील?" लखनौ विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील एका सहाय्यक प्राध्यापकाची ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि संपूर्ण उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात लखनौ पोलिसांनी प्राध्यापक डॉ. परमजीत सिंग याला अटक केली आहे. परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनीकडे अश्लील मागणी करणे आणि विद्यापीठाचे गोपनीय पेपर लीक केल्याचा गंभीर आरोप या प्राध्यापकावर आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये प्राध्यापक डॉ. परमजीत सिंग हा संबंधित विद्यार्थिनीवर वारंवार भेटण्यासाठी दबाव टाकत असल्याचे ऐकू येते. "प्रयत्न करू नको, परीक्षेच्या आधी सात दिवसांच्या आत मला येऊन भेट," असे म्हणत तो तिला अंतर्गत शैक्षणिक फायदे आणि थेट परीक्षेचे प्रश्नपत्रिक उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत होता. विद्यार्थिनीने नकार देऊनही, त्याने तिला पैशांचे आमिष दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

पीडित विद्यार्थिनीने या छळाला कंटाळून प्राध्यापकासोबतच्या संभाषणाचे तीन ऑडिओ रेकॉर्डिंग विद्यापीठ प्रशासनाकडे सोपवले. यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी १५ मे रोजी हसनगंज पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. विद्यापीठाने अंतर्गत चौकशी समिती स्थापन केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आणि संभाषणाचे सर्व पुरावे एका पेन ड्राईव्हच्या माध्यमातून पोलिसांना सुपूर्द करण्यात आले.

मध्य परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विक्रांत वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्राध्यापकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि उत्तर प्रदेश सार्वजनिक परीक्षा कायदा, २०२४ च्या कलम ११ आणि १३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संतापजनक प्रकारानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि समाजवादी छात्र सभा या विद्यार्थी संघटनांनी लखनौ विद्यापीठ कॅम्पसमध्ये तीव्र निदर्शने केली. संतप्त विद्यार्थ्यांनी प्रॉक्टर कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत प्राध्यापकाला तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. प्राणीशास्त्राचे अंतिम वर्षाचे पेपर खरोखरच लीक झाले होते की केवळ विद्यार्थिनीला जाळ्यात ओढण्यासाठी हा प्रकार केला गेला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा