..संवादच साधला नाही तर प्रश्न सुटणार कसा? अजय खोलकरांचा सवाल.

पणजी : मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीने आज संध्याकाळी पणजी येथील पक्ष मुख्यालयात एका विशेष चर्चेचे आयोजन केले होते.
दुपारी ३.०० ते ७.०० या वेळेत होणाऱ्या या बैठकीत आमदार बोरकर यांच्यासह त्यांचे तीन पदाधिकारी आणि पक्षाचे मुख्य नेते मनोज परब, विश्वेश नाईक यांच्यात सविस्तर चर्चा होऊन तडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, आमदार बोरकर यांनी केंद्रीय समितीचे हे आवाहन फेटाळून लावत बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. याविषयी गोवन वार्ताशी बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली की, आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे आपण प्रचंड दुखावलो गेलो आहोत. स्वतःचाच पक्ष आणि आपलीच माणसे 'असे' आरोप करतील, असे कधीच वाटले नव्हते. तसेच आपण सध्या गोव्यात नसल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण घडामोडींवर आरजीपीचे खजिनदार अजय खोलकर यांनी पक्षाची बाजू मांडली. ते म्हणाले की, पक्षांतर्गत वाद आणि गोंधळ कायमचा बंद व्हावा यासाठी केंद्रीय समिती मनापासून प्रयत्न करत आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी समोर येऊन चर्चा करणे आणि त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत हे सांगणे गरजेचे आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यास पक्ष तयार आहे, परंतु त्यांनी संवादच साधला नाही तर हा गंभीर विषय कसा सुटणार, असा प्रश्न उपस्थित करत खोलकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.