
मडगाव : मडगावमधील ऐतिहासिक कोमुनिदाद इमारतीची (Comunidades building, Margao) सध्याची दुरवस्था आणि काही दिवसात येणारा पाऊस लक्षात घेऊन, सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षिण विभाग कोमुनिदाद प्रशासकीय इमारतीच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ‘वर्क ऑर्डर’ जारी केली आहे.
इमारतीच्या देखभालीचे हे काम पर्वरी येथील मेसर्स सुपरकॉन्स इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २.९६ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. हे निविदा मूल्य मूळ अंदाजपत्रकापेक्षा म्हणजेच २.११ कोटी रुपयांपेक्षा सुमारे ३९.९८ टक्के जास्त आहे. या प्रकल्पाचे काम १८ मे २०२६ पासून सुरू होणार असून; ते १३ मार्च २०२७ पर्यंत म्हणजेच ३०० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दक्षिण गोव्यातील (South Goa) काणकोण, चिकोळणा, चिंचणी, लोटली, मडगाव, बाणावली आणि नागोवा कोमुनिदादच्या प्रतिनिधींनी या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी लावून धरली होती. पावसाळ्यापूर्वी छताची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून गळतीमुळे ऐतिहासिक कागदपत्रांचे नुकसान होणार नाही.
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले की, अर्थ विभागाकडून खर्चाला मंजुरी मिळताच कामाला सुरुवात केली जाईल. त्यानुसार आता कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराला तातडीने कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत.
या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. इमारतीच्या सुधारित निचरा व्यवस्थेसह जुन्या नोंदींचे जतन करण्यावरही या प्रक्रियेत भर दिला जाणार आहे.