आपत्ती व्यवस्थापनाबाबत सरकारची पूर्वतयारी पूर्ण : मुख्यमंत्री

घेतला आढावा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
17 mins ago
आपत्ती व्यवस्थापनाबाबत सरकारची पूर्वतयारी पूर्ण : मुख्यमंत्री

पणजी : मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी (Disaster Management)  सरकारची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी मान्सूनपूर्वक कामांसह, अतिरिक्त रुग्णवाहिका, तालुकास्तरावरील २४ तास उपलब्ध असणारी कंट्रोल रूम, एनडीआरएफची (NDRF) स्वतंत्र तुकडी,  तटरक्षक दलाच्या बोटी, पंचायत, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांना विशेष निधी उपलब्ध करून देणे; अशा विविध उपाययोजना केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी दिली. सोमवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना (Depurty Collector) ५ लाख रुपये, पंचायतींना ३५ हजार रुपये, नगरपालिकांना ६० ते ७० हजार रुपये, पणजी महापालिकेला १.२० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. याशिवाय उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला ४ कोटी, दक्षिण गोव्याला ३ कोटी तर कुशावती जिल्ह्यासाठी २ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयांकडे अतिरिक्त निधींसाठी मागणी करता येईल. अपघातांची शक्यता गृहीत धरून राष्ट्रीय महामार्गावर ४ अत्याधुनिक रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.

ते म्हणाले, मान्सून काळात सरकार भारतीय नौदलाच्या १० पाणबुड्यांची मदत घेणार आहे. या पाणबुड्यांचा ५० लाख रुपयांचा विमा केला आहे. अरुंद रस्त्यांसाठी ९६ लाख रुपये खर्चून लहान अग्निशामक बंबाची खरेदी केली आहे. सरकारने १७२ जणांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षित आपदा मित्र, सखींना प्रती दिवस ७५० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. तालुकास्तरावर चोवीस तास उपलब्ध असणारी कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर लवकरच जाहीर केले जातील.

एनडीआरएफची तुकडी चार महिने गोव्यात

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मान्सूनच्या चार महिन्याच्या काळासाठी एनडीआरएफची एक तुकडी गोव्यात तैनात केली जाणार आहे. तटरक्षक दलातर्फे सागर कवच अंतर्गत गोव्याच्या किनाऱ्यांवर दोन बोटी तैनात केल्या आहेत. अग्निशामक दल व अन्य आपत्कालीन सेवा देण्याचा कालावधी ६ मिनिटांपर्यंत कमी करण्याचे आमचे ध्येय आहे. 

कामगारांची रक्त तपासणी करणे आवश्यक 

मुख्यमंत्री म्हणाले की मान्सून काळात, डेंग्यू मलेरिया सारखे रोग पसरण्याची शक्यता असते. यामुळे बाहेरून येणाऱ्या कामगारांची रक्त तपासणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. आपल्या खोल्या भाड्याने देणाऱ्या घरमालकांनी देखील बाहेरून येणाऱ्या कामगारांची चाचणी करून घ्यावी. 

प्राधिकरणाची पुनर्रचना 

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची लवकरच पुनर्रचना करण्यात येणार आहे. यानुसार प्राधिकरण मान्सूनच्या चार महिन्यांची शिवाय अन्य महिन्यांतही केवळ आपत्ती व्यवस्थापनाचे काम करेल. यासाठी महसूल, अग्निशामक दल, पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल.

हेही वाचा